पुणे : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाचे मोटारीतून अपहरण करणाऱ्या महिलेला उत्तमनगर पोलिसांनी गुजरातमधील वापी परिसरातून अटक केली. महिलेने तरुणाचे अपहण करण्यासाठी दोघांना सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरात ही घटना घडली होती.

या प्रकरणी एका महिलेसह प्रथमेश राजेंंद्र यादव (वय २१, रा.बच्छाव वस्ती, पुसेगाव ता. खटाव, जि. सातारा), अक्षय मारुती कोळी (वय २६, रा. पुसेगाव गोरेवस्ती, ता.खटाव, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली. उत्तमनगर पोलिसांनी गुजरातमधील वापी परिसरात असलेल्या एका हाॅटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली.२३ वर्षीय तरुण मूळचा सोलापूरचा आहे. त्याचा भाऊ एनडीए रस्ता परिसरात राहायला आहे. तरुण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून गुजरातमधील वापी परिसरात असलेल्या एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याचे तेथे एका २८ वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचा विवाह करण्याचा निश्चित केले होते. त्याला सोलापूरला बोलावून घेतले. वापीतील खासगी कंपनीतील नोकरी सोडून तो सोलापूरला आला होता.

हेही वाचा >>>पुणे : कोंढव्यात पावसात थांबलेल्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

तरुणाने प्रेमसंबंध तोडल्याने विवाहित तरुणी त्याच्यावर चिडली होती. महिलेने तरुणाचे अपहरण करण्याचा कट रचला. आरोपी प्रथमेश यादव, अक्षय कोळी यांना अपहरण करण्यासाठी पैसे दिले. एनडीए रस्त्यावरील कोढवे धावडे परिसरातून चार दिवसांपूर्वी महिलेसह तिच्या साथीदारांनी तरुणाचे मोटारीतून अपहरण केले. तरुणाच्या भावाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पथकाने तातडीने तपास सुरू केला. एनडीए रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा तरुणाचे मोटारीतून अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले. तांत्रिक तपासात आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती उत्तमनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस कर्मचारी हजारे, हुवाळे, पाडाळे आदी वापीला रवाना झाले. एका हाॅटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका करण्यात आली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर महिलेबरोबर असलेल्या दोन साथीदारांना पुसेगाव येथून अटक करण्यात आली.

हेही वाचा >>>मी खडकवासला मतदार संघामधून अगोदरच पक्षाकडे उमेदवारी मागितली: रुपाली चाकणकर

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, उमेश रोकडे, पोलीस उपनिरीक्षक माने, तानाजी नांगरे, किरण देशमुख, विनोद शिंदे आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader