पुणे : ओपन सर्जरी किंवा जास्त चिरफाड न करता लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूत्रपिंड दात्याकडून काढून त्याचे प्रत्यारोपण ओपन पद्धतीने करण्याची शस्त्रक्रिया पुण्यातील रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली आहे. दोन रुग्णांवर ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
युरोकूल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटचे (युरोकूल रुग्णालय) संस्थापक डॉ. संजय कुलकर्णी व डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. लॅप्रोस्कोपी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ओपन सर्जरीविना मूत्रपिंड दात्याचे मूत्रपिंड लॅप्रोस्कोपी पद्धतीने काढून ते ओपन पद्धतीने रुग्णावर बसवण्याची शस्त्रक्रिया या दांपत्याने २००० मध्ये पुण्यात सुरू केली. युरोकूल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्येही याच प्रकाराने दोन यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
हेही वाचा : गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण! पूर्ण गुडघ्याऐवजी फक्त घर्षण झालेला भाग बदलून उपचार
याबाबत डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले की, डॉक्टर असलेल्या वडिलांचे मूत्रपिंड मुलाला व नणंदेचे मूत्रपिंड भावजयीला अशा या दोन मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत्या. कोणत्याही रक्तस्रावाशिवाय झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांना तिसऱ्या दिवशी घरी पाठवण्यात आले. आज या चौघांचेही स्वास्थ्य उत्तम आहे. सततचे डायलिसिस टाळण्यासाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण महत्त्वपूर्ण ठरते. ही शस्त्रक्रिया सहज झाल्याने रुग्णांना लवकर बरे होण्याचा विश्वास मिळाला आहे.