पुणे : विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागाकडील बालवाडी शिक्षिका, सेविका तसेच रोजंदारीवरील रखवालदार शिपाई यांनी गुरुवारी महापालिका भवनापुढे आक्रोश आंदोलन केले. पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)च्या वतीने आंदोलन करण्यात आले.
महापालिकेचे अतिरिक्त महापालिका रवींद्र बिनवडे यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. यासंदर्भात पंधरा दिवसात ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले. कामगार युनियनचे युनियनचे अध्यक्ष उदय भट, संयुक्त चिटणीस मधुकर नरसिंगे, रोहिणी जाधव, उपाध्यक्ष शोभा बनसोडे, सुदाम गोसावी, दिलीप कांबळे, वैजीनाथ गायकवाड, विभागीय अध्यक्ष राम अडागळे, रमेश पारसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बालवाडी शिक्षिका आणि सेविका महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये गेली वीस वर्षांपासून तुटपुंज्या एकवट वेतनावर काम करत आहेत. मान्य परिपत्रकानुसार दहा टक्के वेतन वाढ अदा केली जात नाही. बालवाडी सेविका शिक्षिका यांना १२ वर्षे पूर्ण झाल्यावरची पगार वाढ द्यावी, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे अंशदायी वैद्यकीय साह्य योजनेचा लाभ देण्यात यावा. वेतन चिठठी , ओळखत्र देण्यात यावे, वैद्यकीय रजा मिळावी, बोनसची रक्कम तातडीने द्यावी, रोजंदारी सेवकांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे या आणि अशा विविध मागण्यांवर अद्याप निर्णय झालेला नाही.
हेही वाचा >>> लाखो भाविकांच्या उपस्थितीत देहूत बीज सोहळा उत्साहात
बालवाडी शिक्षिका आणि सेविका तसेच रोजंदारी रखवालदार शिपाई यांच्या प्रश्नाच्या संदर्भात अनेकवेळा चर्चा झाली. मात्र मागण्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आता न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई लढली जाईल. प्रशासनाची वेळकाढू भूमिका मान्य नाही. त्यामुळे दर महिन्याला निदर्शने करण्यात येतील, असे युनियनचे अध्यक्ष उदय भट यांनी सांगितले.