पिंपरी : माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला भविष्यात आणखी चांगले दिवस येणार असल्याने हिंंजवडी ‘आयटी पार्क’चा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करून या शहराचे नामकरण ‘पिंपरी-चिंचवड-हिंजवडी महापालिका’ असे करावे. त्यामुळे या शहराची ओळख ऑटो मोबाइल उद्योगाबरोबरच ‘आयटी हब’ अशी होईल, असे मत कायनेटीक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले.
आकुर्डीतील एका कार्यक्रमात बोलताना फिरोदिया म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडची ओळख यापूर्वी मोरया गोसावींचे गाव अशी सांगितली जात होती. त्यानंतर टाटा मोटर्स, एमआयडीसी आल्याने उद्योगनगरी अशी ओळख झाली. आता ‘आयटीनगरी’ अशी ओळख व्हावी, यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. या शहराची लोकसंख्या वाढली आहे. जवळच हिंंजवडी ‘आयटी पार्क’ आहे. त्यामुळे महापालिकेत हिंजवडीचा समावेश करावा. त्यामुळे हे शहर केवळ ऑटो मोबाइल उद्योग नाही, तर आयटी हबही आहे, असे नागरिकांना वाटेल.’
‘देशातील सर्वात मोठी एमआयडीसी पिंपरी-चिंचवडमधील आहे. शहरात टाटा मोटर्ससह मोठे उद्योग, कंपन्या आल्याने आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका होण्याचा गौरव पिंपरी-चिंचवडला मिळाला. जकातीच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत होते, असेही ते म्हणाले.