पुणे : ‘देशाच्या व्यवस्थेत मूलभूत सुधारणा करायच्या असतील तर, भ्रष्ट राजकारण्यांवर जलद गतीने खटला चालवणे गरजेचे आहे. नेते प्रामाणिक असतील तर व्यवस्था आणि जनताही प्रामाणिक राहते. त्यामुळे भ्रष्ट नेत्यांवर तत्काळ कारवाई करून त्यांना थेट तुरुंगात धाडायला हवे. अशा नेत्यांना पुन्हा निवडणूक लढवता येऊ नये म्हणून कायदा करण्यात यावा,’ असे मत माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी शनिवारी व्यक्त केले.

‘फिक्की’च्या पुणे विभागाच्या वतीने ‘करेज, कन्वेंक्शन अँड चेंज’ या विषयावरील चर्चासत्रात बेदी बोलत होत्या. सिंबायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया, ‘फिक्की’च्या अध्यक्षा अनिता अग्रवाल, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्राचार्या डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते. किरण बेदी म्हणाल्या, ‘महिलांनी घराबाहेर पडायला हवे. बाहेरच्या जगातील संघर्ष सोसला पाहिजे. त्यांनी मैदानी खेळ, गिर्यारोहनासारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायला हवा. घराच्या चार भिंतींमध्ये राहून महिलांना त्यांची प्रगती साधता येणार नाही. त्यांना बाहेर पडून संघर्ष करावाच लागेल. त्यासाठी कुटुंबातूनही प्रोत्साहन, पाठबळ मिळायला हवे. तेव्हाच मुलींना खऱ्या अर्थाने यशस्वी होता येईल.

‘नेतृत्वगुण घडवावे लागत नाहीत. त्यांची ओळख व्हायला हवी. महिलांमध्ये नेतृत्वासाठीचे अनेक आवश्यक गुण अंगभूत प्राप्त असतात. त्यांना गरज आहे ती, स्वत:वर विश्वास ठेवून चिकाटीने काम करण्याची. जिद्दीने पुढे जाण्याची.’ असेही किरण बेदी म्हणाल्या.पंतप्रधानांच्या गाडीला क्रेनने उचलणे, तिहार जेलमध्ये केलेल्या ‘विपश्यने’च्या उपक्रमांंची माहिती देतानाच बेदी यांनी अधिकारी म्हणून काम करताना आलेेले अनुभव सांगितले.

दस्तऐवजीकरण गरजेचे

आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. चांगले-वाईट प्रसंग समोर येत असतात. त्यांच्या आठवणी जपून ठेवायला हव्यात. समाजात वावरताना अनेक प्रश्न विचारले जातात. निर्णयांची, घटनांची आणि कामाचीही सत्यता तपासली जाते. अशा वेळी जपून ठेवलेले दस्तऐवज कामी येतात. वृत्तपत्राचे छोटे कात्रणही तुमच्या कामाची खात्री पटण्यास पुरेसे ठरते, असे मत किरण बेदी यांनी व्यक्त केले.