देशातील पहिल्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी, मॅगसेसे पुरस्कारविजेत्या अधिकारी आणि दिल्लीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार अशी ओळख असलेल्या किरण बेदी यांचे शिक्षक हे नवे रूप सोमवारी अनुभवले. सतरंजीवर बसलेल्या विद्यार्थ्यांना पाहून व्यासपीठावर खाली बसलेल्या किरण बेदी यांनी संवाद साधत विद्यार्थ्यांचा तास घेतला.
किरण बेदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास उलगडणाऱ्या ‘मेकिंग ऑफ द टॉप कॉप’ या कॉमिक्सचे प्रकाशन किरण बेदी यांच्या हस्ते झाले. भूगाव येथील संस्कृती स्कूलच्या विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी दिलखुलास संवाद साधला. शाळेच्या मुख्याध्यापिका देवयानी मुंगली या वेळी उपस्थित होत्या. या पुस्तकामध्ये माझ्या वयाच्या पंचविशीपर्यंत म्हणजे मी पोलीस दलामध्ये प्रवेश करेपर्यंतचा प्रवास मांडला आहे. त्यापुढच्या आयुष्यातील कामाची माहिती देण्यासाठी या पुस्तकाचा दुसरा भाग (सिक्वल) लवकरच प्रकाशित केला जाणार असल्याचे किरण बेदी यांनी सांगितले.
तुम्ही मला ओळखता का, असे किरण बेदी यांनी विचारताच विद्यार्थ्यांनी ‘येस मॅडम’ असे एकसुरात सांगितले. या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळाले या प्रश्नावर प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी, धैर्य आणि निर्णय घेण्याची क्षमता असे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. शाळेमध्ये शिकविलेले नाही आणि घरामध्ये शिकायला मिळाले नाही असे काय करायला आवडेल, असे किरण बेदी यांनी बालकांना विचारले. ‘मी पालकांना त्रास देणार नाही आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरातील कामामध्ये मदत करेन, असे एका विद्यार्थ्यांने सांगितले. ‘आम्हाला केवळ घेणारे नाही तर तुमच्यासारखे देणारे व्हायचे आहे,’ असे एका मुलीने सांगितले. या उत्तरावर विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
‘शिक्षक’ किरण बेदी यांनी विद्यार्थ्यांचा घेतला तास
सतरंजीवर बसलेल्या विद्यार्थ्यांना पाहून व्यासपीठावर खाली बसलेल्या किरण बेदी यांनी संवाद साधत विद्यार्थ्यांचा तास घेतला.
आणखी वाचा
First published on: 21-04-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran bedi student comics cop