भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जाहीर आव्हान दिलं आहे. राऊतांनी हिंमत असेल तर मुलीचे कोणत्या कोणत्या हॉटेल्समध्ये कार्यक्रम झाले याचं उत्तर द्यावं असं म्हणत तुम्ही सांगणार की मी ऑडीट करू? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. ते पुण्यात भाजपाने पालिकेत केलेल्या सत्कारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी कंपनी ब्लॅकलिस्ट केली. त्यात लिहिलं की या कंपनीला आता महाराष्ट्रात एकही कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना ४ कॉन्ट्रॅक्ट दिले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊतवर गुन्हा दाखल करावाच लागणार आहे. तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. शेकडो लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय. कोविडचे एक एक घोटाळे जेव्हा बाहेर येतील तेव्हा यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही.”
“तो चहावाला कोण आहे याचं संजय राऊत यांनी उत्तर द्यावं”
“संजय राऊत रोज उठून कधी अफगाणिस्तान, कधी चीनच्या, पाकिस्तानच्या, ऑस्ट्रेलियाच्या गोष्टी करतात. आम्ही गृहसचिवांकडे गेलो तर म्हणाले आंतरराष्ट्रीय न्यायालयात जा. तो चहावाला कोण आहे त्याचं उत्तर द्या. परळमध्ये चहाची किटली घेऊन जाणारा तुमच्या कंपनीत पार्टनर आहे. तो कोण आहे ते सांगा,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं.
“राऊतांनी नाव घेतल्याने मला डेकोरेटरचं नाव सांगावं लागेल”
किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “आम्ही विषय काढला नव्हता, पण यांनी ५ पानी पत्र उपराष्ट्रपतींना लिहिलं. त्यात त्यांनी मुलीच्या लग्नातील डेकोरेटरला ईडीने बोलावून त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि हवातसा जबाब द्या म्हणून सांगितलं. राऊतांच्या मुलीचं लग्न झालं. आम्ही मुलीला शुभेच्छा दिल्या. आम्ही डेकोरेटरचं नाव घेतलं का? आम्ही नाव घेतलं नाही, पण आता राऊतांनी नाव घेतल्याने मला ते नाव सांगावं लागेल.”
हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे पोलिसांचा माफियासारखा वापर करत आहेत – किरीट सोमय्यांचा आरोप
“संजय राऊत यांच्या मुलीचे कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये कार्यक्रम झाले? ते सांगणार की मला सांगावं लागणार? मी ऑडिट करू का? संजय राऊत यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं. कोणत्या हॉटेलमध्ये कार्यक्रम झाले, कोणत्या डेकोरेटरला किती लाख दिले, किती लाख खर्च झाले, त्यातले किती तुम्ही दिले? संजय राऊत माफिया साहेब हिशोब तर द्यावा लागणार आहे. ५५ लाख चोरीचे परत द्यायला लावले की नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.