भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या हत्येप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. हेमंत करकरे यांची हत्या कोणी केली? असा प्रश्न सोमय्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित व्यावसायिकांचे हेमंत करकरे यांच्या हत्येशी संबंधित लोकांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. ते मंगळवारी (२४ मे) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, “मी फार जबाबदारीने जाणीवपूर्वक सांगतोय की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागिदारांचे संबंध कसाबपर्यंत आहेत. त्यांचे संबंध कसाबचं कटकारस्थान करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार यांच्याशी व्यावसायिक संबंध असणाऱ्यांचा संबंध हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्यांशी आहे.”
“हेमंत करकरे यांची हत्या दोन कारणांनी झाली. ही हत्या कसाबच्या सहकाऱ्यांनी, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केली. मात्र, हेमंत करकरे यांचा मृत्यू बुलेट प्रुफ जॅकेट नकली असल्याने झाला. बुलेटप्रुफ जॅकेट बोगस असल्याने हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला. त्या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा विमल अग्रवाल याने केला होता. त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या गेल्या. विमल अग्रवालला अटक झाली,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
हेही वाचा : “आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली, काय कारवाई झाली?”, किरीट सोमय्यांचा सवाल
“ज्या विमल अग्रवालला बोगस बुलेटप्रुफ जॅकेटप्रकरणी अटक झाली त्याचं नाव यशवंत जाधववर धाडी टाकल्या तेव्हा पुढे आलं होतं. यशवंत जाधव उद्धव ठाकरे यांचे ‘उजवे हात’ आहेत. जाधवांनी एक हजार कोटी रुपयांची माया जमवली आहे,” असाही आरोप सोमय्या यांनी केला.