पुणे : भारतीय नौदल आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांच्यात ‘मेक – १’ अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्प करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत कंपनी सहा मेगावॉट क्षमतेच्या मध्यम गतीच्या सागरी डिझेल इंजिनची रचना करून ते विकसित करणार आहे.
पुण्यात मुख्यालय असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीकडून या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या प्रारूप डिझेल इंजिनमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त स्थानिक घटकांचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील ७० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे. कंपनी ३ ते १० मेगावॉट क्षमतेची मध्यम गतीची इंजिनची रचना करून ती विकसित करणार आहे. ही इंजिने भारतीय नौदल आणि भारतीय किनारा रक्षक दलाच्या जहाज चालविण्यासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जातील. सध्या ही इंजिन प्रामुख्याने परदेशातून आयात केली जातात. त्यामुळे हा प्रकल्प केंद्र सरकारच्या स्थानिक उत्पादन आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आला आहे.
कंपनीचे औद्योगिक व्यवसाय प्रमुख विनोद मेनन, मुख्य वित्तीय अधिकारी सचिन केजरीवाल, सागरी आणि संरक्षण व्यवसाय प्रमुख संजय मुजुमदार आणि सागरी विभागाचे प्रमुख नजीब रहमान यांच्या उपस्थितीत या करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली.
याबाबत किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका गौरी किर्लोस्कर म्हणाल्या की, नौदलाने या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आम्हाला निवडल्याचा आम्हाला अभिमान आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. आमच्या तांत्रिक आणि संशोधन व विकास क्षमतांच्या बळावर आम्ही भारतीय नौदलासाठी जागतिक दर्जाचे उत्पादन पुरवू, याची आम्हाला खात्री आहे.