आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील किर्लोस्कर कुटुंबाचे योगदान.. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्तरावर किर्लोस्कर मासिकाने निर्माण केलेले स्थान.. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वाङ्यम प्रकाशित करणारे आणि विचारशील वाचक घडविणारे मासिक.. विवेकाचे अधिष्ठान आणि उदारमतवादाचा पुरस्कार करीत गोंधळलेल्या समाजाची किल्मिषे दूर करणारे नियतकालिक.. किर्लोस्कर मासिकाने घडविलेले लेखक.. अशा सुवर्णस्मृतींना उजाळा देत विविध वक्तयांनी रविवारी शब्दमैफल रंगविली.
नंदिनी पब्लिशिंग हाऊसतर्फे डॉ. मंगेश कश्यप लिखित ‘किर्लोस्करीय’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, अरविंद व्यं. गोखले, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, माजी आमदार उल्हास पवार, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि प्रकाशक संतोष तांबोळी या वेळी उपस्थित होते.
 कोणत्याही गावाला गेल्यानंतर एसटी स्थानकावरीस स्टॉलवर वृत्तपत्र विकत घेणाऱ्या माणसांच्या विक्रेत्याशी होणाऱ्या गप्पांमधून नवे विषय ताज्या अंकातून हाताळणारे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांच्याबरोबर केलेली भटकंती या आठवणी सुधीर गाडगीळ यांनी सांगितल्या. साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात रचनात्मक काम करणाऱ्या नियतकालिकाच्या इतिहास उलगण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे मंगेश तेंडुलकर यांनी सांगितले. हे पुस्तक केवळ भाषाभ्यासाचे नाही तर, सामाजिक-सांस्कृतिक उत्थानाचे असल्याचे मत डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.
सध्या मूल्याधिष्ठित लेखन कमी होत असून अवगुणांनाच महत्त्व प्राप्त झाले आहे. समाजामध्ये सर्वच क्षेत्रात बिघाड झाला आहे. असे असले तरी संस्कार करून चारित्र्यसंपन्न माणसे घडविणाऱ्या वाङ्मय आणि शिक्षण या दोन क्षेत्रांना बिघडून जमणार नाही, असे भास्करराव आव्हाड यांनी सांगितले. शैला मुकुंद यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader