पुणे : राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तिच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा आणि तिची स्वच्छता राखण्यासाठी तरुण पिढी प्रेरीत व्हावी या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या ‘राम नदी पुनरूज्जीवन अभिमान’ ला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून पाचवा ऑनलाईन ‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सव‘ २४ मार्चपासून तीन दिवस दररोज एक तास प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

सोलापूर येथील पर्यावरणतज्ज्ञ आणि राम नदी अभ्यासक डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांच्या भाषणाने २४ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन राम नदी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर, महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डाॅ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते डाॅ. बडगबाळकर यांना पहिला राम नदी सेवक सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. वसुंधरा महोत्सवाचे अध्यक्ष आर. आर. देशपांडे, आनंद चितळे आणि डॉ. गुरुदास नूलकर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात राम नदी विषयक कल्पक उपक्रम,  कार्यशाळा आणि निसर्ग परिक्रमांवर आधारित चित्रपटांचा समावेश या महोत्सवात करण्यात आला आहे. यात राम नदीची ओळख, सफर पाषाण येथील सोमेश्वर मंदिराची, राम नदीचे भूजल व्यवस्थापन या विषयांवर व्याख्याने होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

महोत्सवात विजय परांजपे, ॲड. अनिल कोकाटे, परीणिता दांडेकर, सुरभी केसरवानी, विकास चौहान, प्राची क्षीरसागर, अश्विनी कुलकर्णी, डॉ. संजय खावट, डॉ. राजेंद्र सिंह, राजेश पंडित, धनंजय बेळे, डॉ. धनश्री हरदास, शगुन कपिल, उम्रा अनिस, फराज अहमद, सुनीता नरेन, राजीव कुमार मित्तल, के. अशोक नटराजन, विवेक घोडमारे, डॉ. अर्पित सिंग, के. जे. श्रीराम, मनीष मिश्रा यांचा सहभाग आहे.

बाणेर, पाषाण आणि भुकूम या भागातून वाहणाऱ्या आणि सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या १९ किमी. लांबीच्या राम नदीचा प्रवाह पूर्वीप्रमाणे शुद्ध व्हावा, ती अविरल व निर्मळ व्हावी या उद्देशाने गेली पाच वर्षे आम्ही काम करीत आहोत. अशा नद्या शांतताप्रिय आणि आनंदी समाज घडविण्यासाठी मदत करतील तसेच भावी पिढ्यांसाठी समृद्ध निसर्ग निर्माण करतील अशी धारणा आहे. नदीच्या पुनरूज्जीवनासाठी एक सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रारूप तयार करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे हा राम नदी महोत्सव आहे. – वीरेंद्र चित्राव, संयोजक, किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सव

महोत्सवाची वैशिष्ट्ये

– किर्लोस्कर वसुंधराच्या फेसबुक पेजवरून प्रक्षेपण

– २४ मार्चपासून तीन दिवस ऑनलाईन पाहण्याची संधी

– दररोज सकाळी ११ ते १२ या वेळात

– पुन:प्रक्षेपण : सायंकाळी ७ ते ८

Story img Loader