‘खूश है जमाना आज पहली तारीख है’ हे गीत ऐकण्यासाठी मी रेडिओसमोर बसायचे. मी चित्रपटसृष्टीमध्ये येण्याची किंवा किशोरकुमार यांच्याशी विवाह होईल हे त्यावेळी कोणी सांगितले असते तर, मला खरेही वाटले नसते. पण, या दोन्ही गोष्टी जुळून आल्या. किशोरदा यांच्यामुळेच माझे आयुष्य आहे. जीवनामध्ये खूप काही कमावलं. पण किशोरदा यांना गमावलं.. ‘मनचली’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘अनहोनी’ या चित्रपटांद्वारे रसिकांच्या मनात घर करून राहिलेल्या अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी दिलखुलास गप्पांच्या मैफलीतून आपल्या आयुष्यातील सोनेरी आठवणींचा पट मंगळवारी उलगडला.
‘हार्मनी’ संस्थेतर्फे पाश्र्वगायक किशोरकुमार यांच्या गीतांवर आधारित ‘मैने कुछ खोया है, मैने कुछ पाया है’ हा कार्यक्रम बुधवारी (२३ डिसेंबर) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रात्री साडेनऊ वाजता होणार असून यामध्ये लीना चंदावरकर किशोरकुमार यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. त्या निमित्ताने चंदावरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गायक मकरंद पाटणकर या वेळी उपस्थित होते.
पाने की खुशी जल्दी खत्म होती है लेकीन खोने का दुख भूलना बहोत कठीण है’, अशा शब्दांत त्यांनी किशोरकुमार यांच्याशी असलेले नाते उलगडले. पहिला विवाह अपयशी ठरल्यानंतर मी काहीशी उदास होते. पण, निखळ विनोदबुद्धी आणि संयम हे गुण असलेल्या किशोरकुमार यांच्याशी भेट झाली. नकळतपणे मी त्यांच्या प्रेमात पडले. ‘मेरे दिलमें आज क्या है तु कहे तो मैं बता दू’, हे गीत गाऊन त्यांनी चक्क मला मागणी घातली. तर, मीदेखील ‘आपकी नजरोंने समझा प्यार के काबिल मुझे’ हे गीत गायले होते, अशा आठवणी सांगत लीना चंदावरकर म्हणाल्या, किशोरकुमार यांच्याशी विवाह होईपर्यंत त्यांचे आडनाव गांगुली आहे हेदेखील मला माहीत नव्हते. माझा पहिला विवाह केवळ अल्प काळच टिकला. त्यानंतर मी उदास असायचे. मात्र, एका रात्री मी घर सोडून किशोरकुमार यांच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले. आमच्या विवाहानंतर वडील नाराज होते. मात्र, आई-वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही धारवाड येथे घरी गेलो. किशोरदा यांनी चटईवर बसून हार्मोनियम घेऊन एकापाठोपाठ एक गाणी सादर केली. ‘नफरत करनेवालों के सीने में प्यार भर दूँ’ हे गाणे त्यांनी गायला सुरुवात करताच वडील आतल्या खोलीतून बाहेर आले. त्यांचा राग निवळला आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला.
एरवी मरणाचे नाटक करणारे किशोरकुमार १३ ऑक्टोबर १९८७ रोजी खरोखरीच या जगातून निघून गेले. तेव्हा मला हे दु:स्वप्न आहे असेच वाटले. या स्वप्नातून बाहेर यावे म्हणून मी स्वत:ला चिमटादेखील काढला. पण, ते वास्तव होते. किशोरजींच्या पश्चात त्यांच्या गीतांनीच मला जगण्याचे बळ दिले. त्यांच्या प्रेरणेतूनच मी गीतकारही झाले, अशी भावना लीना चंदावरकर यांनी व्यक्त केली.
जीवनात खूप काही कमावलं, किशोरदांना गमावलं
अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी दिलखुलास गप्पांच्या मैफलीतून आपल्या आयुष्यातील सोनेरी आठवणींचा पट मंगळवारी उलगडला
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 23-12-2015 at 03:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishor kumar leena chandavarkar golden memories