लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारांनी कट रचल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोक्यात वार करून सहा जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी पावणे दोनच्या सुमारास नगरपरिषदेच्या आवारात घडली होती. याप्रकरणी आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-सावधान! साखळी ओढून रेल्वे थांबवताय, वर्षभरात १ हजार १६४ जणांना अटक; ३ लाखांहून अधिक दंड
किशोर हे जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष म्हणून सामाजिक काम करत होते. राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे त्याचे राजकीय विरोधक सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच खटका उडत होता. गेल्या सहा महिन्यांपासून किशोर हे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यापासून जीवाला धोका असल्याबाबत सांगत होते. माझा वाहनचालक प्रवीण ओव्हाळ याला सुधाकर शेळके व त्याच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ केली होती. किशोर हे त्याचा मित्र संतोष शेळके याच्यासोबत फिरत होते. ही गोष्टी सुनील व सुधाकर शेळके यांना आवडत नव्हती. सुनील यांचे संतोष सोबत राजकीय वितुष्ट होते. किशोर हा संतोष यास नेहमी मदत करत असे. त्यामुळे सुनील, सुधाकर शेळके हे किशोरवर चिडून असायचे.
किशोर यांनी स्वतःचा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना दोन वर्षापासून पूर्णपणे राजकीय विरोध केला आहे. त्यांच्या चुकीच्या कामाविरोधात वेळोवेळी निदर्शने केली आहेत. समाजमाध्यमावर देखील ही बाब टाकली होती. किशोर यांचे राजकीय वर्चस्व निर्माण होऊन सुनील, सुधाकर यांच्या राजकीय वर्चस्वला धोका निर्माण झाला होता. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल हे त्याने मला सांगितले होते. शुक्रवारी किशोर नगरपरिषदेत गेला असता श्याम निगडकर, त्याच्या तीन साथीदारांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून ठार मारले. आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे यांनी कटकारस्थान रचून त्यांचे साथीदार श्याम निगडकर आणि तीन हल्लेखोरांनी आपापसात संगनमत करून किशोर यांचा खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.