मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि हिंदुत्वावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. वारसा हक्का मुलालाच मिळतो हे सांगताना किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरे यांना तुमची संपत्ती आमच्या तेजसच्या नावावर करणार आहात का? असा थेट सवाल केला. त्या शनिवारी (३० एप्रिल) पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “तुम्ही उद्धव ठाकरे यांचे वडीलही पळवणार का? एकीकडे वारसा हक्क सांगतात, पण वारसा हक्क मुलालाच मिळतो. तुमची संपत्ती आमच्या तेजसच्या नावावर करणार आहात का? ती संपत्ती मुलालाच देणार आहात ना? वडिलांनी केलेली चांगली कर्म, वाईट कर्म मुलालाच मिळतात. बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे आशीर्वाद पुरेपुर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.”
“शिवसेना पक्ष कायम गदाधारीच राहिलाय”
“बाळासाहेब ठाकरे यांनी घंटा वाजवणारं हिंदुत्व नको म्हणून सांगितलं. शिवसेना पक्ष कायम गदाधारीच राहिलाय. चुकीच्या गोष्टींना शिवसेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्र आणि मुंबई वाचवण्याचाच प्रयत्न केलाय,” असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
“भाजपामुळे काकड आरत्या, भजन-कीर्तन यावरही निर्बंध”
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “आपला देश सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारा आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे परवानगी नाही त्यांनी भोंगे काढायचेच आहेत. मात्र, भाजपामुळे हिंदुत्वाच्या सकाळच्या काकड आरत्या, रात्रीचे भजन-कीर्तन यावरही निर्बंध आलेत. यात नेमका कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा आहे?”
“रोख लावण्याची घंटा भाजपा आणि मनसेनेच वाजवली”
“उलट हिंदुत्वाची मंदिरं जास्त होती. त्या सगळ्या मंदिरांवर सकाळी ६ ते रात्री १० असे निर्बंध आलेत. उलट आता बरं झालं. रोख लावण्याची घंटा भाजपा आणि मनसेनेच वाजवली. त्यामुळे यांचं बाडकी हिंदुत्व दिसायला लागलंय,” असंही किशोरी पेडणेकर यांनी नमूद केलं.