पुणे : देशातील अतिश्रीमंताचा सोन्याकडे ओढा वाढू लागला आहे. मागील वर्षी देशातील अतिश्रीमंतांनी केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ६ टक्के सोन्यामध्ये झाली आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण सरासरी ३ टक्के तर आशिया प्रशांत विभागात ४ टक्के आहे.
अतिश्रीमंतांच्या सोन्यातील गुंतवणुकीचा अहवाल ‘नाइट फ्रँक इंडिया’ने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, भारत आणि चीनमध्ये अतिश्रीमंतांनी मागील वर्षी २०२२ मध्ये केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ६ टक्के गुंतवणूक सोन्यात केली. जागतिक पातळीवर अतिश्रीमंतांनी मागील वर्षी केलेल्या एकूण गुंतवणुकीत सोन्याचे प्रमाण ३ टक्के तर आशिया प्रशांत विभागात हे प्रमाण ४ टक्के आहे. सर्वाधिक सोन्यात गुंतवणूक ऑस्ट्रियामध्ये करण्यात आली आहे. तिथे अतिश्रीमंतांनी एकूण गुंतवणुकीपैकी ८ टक्के सोन्यात गुंतवले आहेत.
भारतात अतिश्रीमंतांकडून सोन्यात होणारी गुंतवणूक दरवर्षी वाढत आहे. ही गुंतवणूक २०१८ मध्ये ४ टक्के होती. ती २०२२ मध्ये ६ टक्क्यांवर पोहोचली आहे. सोन्यातून मिळणारा परतावा वाढत असल्याने त्यातील गुंतवणुकीला पसंती दिली जात आहे. सोन्याने मागील पाच वर्षांत (आर्थिक वर्ष २०१९ ते आर्थिक वर्ष २०२३) ६९ टक्के परतावा दिला आहे. करोना संकटामुळे व्याजदरात घसरण झाली होती आणि जगभरातील बँकांनी तरलतेचे सोपे धोरण स्वीकारल्याने सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदवण्यात आली, असे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा – कोंढव्यातील शाळेवर कोणतीही कारवाई नाही; पुणे पोलीस, एनआयएकडून स्पष्टीकरण
जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वारे निर्माण झाले आहे. स्थिर आणि महागाईपासून संरक्षण करेल अशा गुंतवणूक पर्यायाला गुंतवणूकदार पसंती देत आहेत. यामुळे सोन्याकडे ओढा वाढला आहे, असे नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले.
जगभरातील अतिश्रीमंतांची सोन्यातील गुंतवणूक
- ऑस्ट्रिया : ८ टक्के
- भारत : ६ टक्के
- चीन : ६ टक्के
- झेक प्रजासत्ताक : ५ टक्के
- संयुक्त अरब अमिराती : ४ टक्के