पुणे : रुग्णाच्या छातीत आणि पाठीत अचानक वेदना सुरू झाल्या. त्यावेळी त्याची महाधमनी विस्तारल्याचे समोर आले. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यावर तातडीने ‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ ही अतिशय गुंतागुंतीची आणि दुर्मीळ शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्या रुग्णाचा जीव वाचू शकला.
सह्याद्री रुग्णालयात ५५ वर्षे वयाच्या महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलेच्या महाधमनीचा विस्तार झाल्याचे निदर्शनास आले होते. सर्वसामान्यतः महाधमनी २५ ते ३० मिलीमीटर व्यासाची असते तर या महिलेची ती दुप्पट म्हणजे ६० मिलीमीटर व्यासाची झाली होती. याची तीव्रता लक्षात घेता सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉ. स्वप्नील कर्णे आणि डॉ. शंतनू शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने विस्तारलेली महाधमनी बदलण्यासाठी ‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. त्यांनी रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. ही दुर्मीळ प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा करण्यात आली आहे.
महाधमनीचा जास्त विस्तार होण्याची प्रक्रिया अतिशय कमी रुग्णांमध्ये आढळते. रुग्णाला त्याची जाणीव नसते. परंतु, अचानक छातीत आणि पाठीत वेदना सुरू होतात. त्यावेळी तातडीने निदान आणि शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. कारण महाधमनीतून शरीराला होणारा रक्तपुरवठा थांबल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ ही गुंतागुंतीच्या प्रक्रिया तातडीने करावी लागते. त्यात रुग्णाच्या शरीराला होणारा रक्तपुरवठा थांबवावा लागतो. त्याचवेळी त्याच्या मेंदूला मात्र रक्तपुरवठा सुरू ठेवला जातो. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असून, ती यशस्वी होण्याचे प्रमाणही कमी आहे. परंतु, रुग्ण दगावण्यापेक्षा त्याचा जीव वाचविण्यासाठी ही प्रक्रिया करणे योग्य ठरते, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा : हृदयविकाराचा धोका वेळीच टाळता येणार! आता रुग्णांसाठी नवीन डिजिटल उपचारपद्धती
शरीराचा रक्तपुरवठा २० मिनिटे बंद
‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ प्रक्रियेमध्ये रुग्ण महिलेची विस्तार पावत असलेली संपूर्ण महाधमनी बदलण्यात आली. त्याजागी ‘स्पेशल ग्राफ्ट’ बसविण्यात आला. यामध्ये महिलेची संपूर्ण रक्ताभिसरण संस्था तात्पुरती २० मिनिटे थांबवण्यात आली होती. त्या वेळेत महाधमनी बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या दरम्यान रुग्णाच्या मेंदूला सातत्याने रक्तपुरवठा होत राहावा यासाठी ‘अँटीग्रेड सेरेब्रल पर्फ्यूजन’ तंत्र वापरण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मेंदूशी निगडित कोणत्याही समस्या उद्भवल्या नाहीत. त्यामुळे पाच ते सहा दिवसांत या रुग्ण महिलेची प्रकृती स्थिर झाली, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.