पुणे : पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून सन २०१९ मध्ये अनुक्रमे भाजपचे गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे, तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले. पुण्यातून ३१, तर बारामतीतून १८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शिरूर आणि मावळमधून अनुक्रमे २३ आणि २१ उमेदवार निवडणुकीला उभे होते.

निवडणूक पार पडल्यानंतर या चारही मतदारसंघातील निवडणूक निकालाविरोधात विविध कारणे देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या आहेत. या प्रकरणांची सुनावणी अद्याप सुरू आहे. परिणामी या निवडणुकीत वापरलेली मतदान यंत्रे मोहोरबंद करून भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली आहेत.

या याचिकांचा निकाल लागत नाही, तोवर या निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदान यंत्रे तशीच ठेवावी लागतात. त्यामुळे बॅलेट युनिट, कण्ट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशी मिळून एकूण तब्बल २८ हजार मतदान यंत्रे गेल्या पाऊणे पाच वर्षांपासून धूळखात पडली आहेत.

हेही वाचा : रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्हाला याचं…”

पुण्याचे खासदार बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची याचिका आपोआप निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात वापरण्यात आलेली मतदान यंत्रे बेंगळुरू येथे परत पाठवून देण्यात आली आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी सांगितले.

Story img Loader