पोलीस स्टेशन म्हटलं की सर्व सामान्य नागरिकांना सरकारी हेलपाटे आणि किचकट प्रक्रिया यामुळे नको वाटतं. त्यामुळे जेव्हा गरज येते तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गोंधळून जायला होतं. त्यात पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांचं वर्तन हेही अनेकांच्या तक्रारीचा विषय असतो. मात्र, पुणे पोलिसांनी याला फाटा देत स्वतः नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांबाबत जागृक करण्यास सुरुवात केलीय. तसेच कायदेशीर प्रक्रिया सोप्या स्टेप्समध्ये समजून सांगण्याचा उपक्रम हाती घेतलाय. याला ‘तुमचे अधिकार माहिती करून घ्या’ (Know your rights) असं नाव देण्यात आलंय. या मोहिमेत आता पुणे पोलिसांनी पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR दाखल करण्याची प्रक्रिया काय असते याची माहिती दिलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे पोलिसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “‘पोलीस स्टेशन किंवा चौकीत जाण्यापासून’ ते ‘तुमच्या हातात तक्रारीची प्रत मिळेपर्यंत’ #FIR प्रक्रिया प्रत्यक्षरित्या कशी पार पडते याबाबत पुणे नागरिकांना जागरूक करण्यासाठी आम्ही या प्रक्रियेच्या ८ महत्वाच्या पायऱ्या समाविष्ट करत आहोत.”

पुणे पोलिसांनी सांगितलेल्या या ८ स्टेप्स दोन टप्प्यांमध्ये सांगितल्या आहेत. दर दिवशी एक ट्वीट करत या ८ स्टेप्स दोन दिवसात सांगण्यात आल्यात. विशेष म्हणजे मराठीसोबतच इंग्रजीतही हे ट्वीट्स करण्यास आलेत. यात आम्ही या मोहिमेत नागरिकांना एफआयआर दाखल करण्याबाबत माहिती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही म्हटलं आहे.

काय आहेत या ८ पायऱ्या?

१. तुम्ही गुन्ह्याची माहिती ज्यांच्या न्यायाधिकारक्षेत्रात नोंदवायची आहे त्या जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा चौकीत जावे.

२. फ्रंट डेस्कवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घटना सविस्तपणे सांगा.

३. तो हस्तलिखित जबाब सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम) प्रणालीच्या ऑपरेटरला दिले जाते. तेथे अधिकृतपणे एफआयआर नोंदवली जाते.

४. कॉन्स्टेबलने दिलेले हस्तलिखित सीसीटीएनएस ऑपरेटर टाईप करते. तसेच योग्य आयपीसी (IPC) कलमांची निवड करते आणि आढावा घेण्यासाठी एफआयआर प्रत तयार करते.

५. यानंतर सीसीटीएनएस ऑपरेटर एफआयआरची प्रिंट काढते आणि पुढील प्रक्रियेसाठी संबंधित कॉन्स्टेबलकडे लेखी जबाब आणि ती प्रत देते.

६. कॉन्स्टेबल ही प्रत पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांकडे देतो. ते एफआयआर वाचून त्यातील कलमं किंवा इतर काही दुरूस्ती असेल तर सुचवतात.

७. यानंतर त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी तक्रारदार आपल्या तक्रारीची (FIR) प्रत घेण्यासाठी येतो.

हेही वाचा : पुणेकरांनो सावधान… शहरामध्ये ‘टायर पंक्चर रॅकेट’चा भांडाफोड; समोर आली धक्कादायक माहिती!

८. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी तुम्हाला या तक्रारीबाबत काही घडामोडी घडल्या तर माहिती देतात. तुम्ही देखील काही शंका असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करून एफआयआर क्रमांक सांगत माहिती घेऊ शकता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know eight simple steps to register fir in police station and getting its copy pbs