ICC Cricket World Cup 2023 : सलग तीन विजयांनंतर विश्वचषकाकडे आगेकुच करणाऱ्या भारतीय संघाचा आज (१९ ऑक्टोबर) चौथा सामना बांगलादेशशी होणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने क्रिकेटचे चाहत्यांची पावलं पुण्यातील गहुंजे स्टेडियमकडे वळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचा आनंद घेण्यासाठी केवळ १०० रुपयांमध्ये गहुंजे स्टेडियमवर कसं पोहचायचं याचा हा आढावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेट चाहत्यांना आजच्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचा आनंद घेण्यासाठी सहजपणे गहुंजे स्टेडियमवर पोहचता यावं म्हणून पुणे महानगर परिवर्तन महामंडळाने (पीएमपीएमएल) विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजे स्टेडियम पुणे शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळेच पीएमपीएमएलने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध ठिकाणांवरून गहुंजे स्टेडियमवर जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केली.

गहुंजे स्टेडियमला जाण्यासाठी कुठून किती बस?

या विशेष व्यवस्थेनुसार गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पुणे महानगरपालिका मुख्यालय, कात्रज बायपास बस स्टॉप आणि निगडी टिळक चौक बस स्टॉप येथून पीएमपीएमएलच्या अनेक बसेस गहुंजे स्टेडियमकडे जातील. पुणे महानगरपालिका मुख्यालय येथून सकाळी ११ वाजता, ११ वाजून ३५ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी अशा तीन बसेस असणार आहेत.

कात्रज बायपास बस स्टेशन येथून सकाळी ११ वाजता व साडेअकरा वाजता अशा दोन बसेस असतील. याशिवाय निगडीच्या टिळक चौक बस स्टेशन येथून दुपारी १२ वाजता आणि साडेबारा वाजता अशा दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : अग्रस्थानाचे भारताचे लक्ष्य! विश्वचषक स्पर्धेत आज बांगलादेश संघाशी पुण्यात गाठ

गहुंजे स्टेडियमला जाण्यासाठी बसभाडे किती?

पीएमपीएमएलने आजच्या क्रिकेट सामन्यासाठी विशेष बसची व्यवस्था करतानाच बसभाड्याचीही माहिती दिली आहे. पुणे महानगरपालिका मुख्यालय आणि कात्रज बायपास येथून जे गहुंजे स्टेडियमला जातील त्यांच्यासाठी प्रत्येक बसभाडे १०० रुपये असणार आहे. निगडी येथून गहुंजेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हेच बसभाडे ५० रुपये इतके आहे. जर आवश्यकता पडली तर पीएमपीएमएलकडून अधिक बससेही या मार्गावर सोडण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know hot to reach at gahunje stadium with rs 100 for india vs bangladesh icc world cup match in pune pbs