पुणे : राज्यात करोना संकटाच्या काळात अवयवदानाचे प्रमाण कमी झाले होते. हे चित्र मागील वर्षी बदलल्याचे दिसून आले. राज्यात मागील वर्षी एकूण १४८ जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले. विशेष म्हणजे त्यातील ५८ जण पुणे विभागातील आहेत. राज्यातील चारही विभागांत पुण्यातील अवयदानाची संख्या सर्वाधिक आहे.
राज्यात २०२३ मध्ये एकूण १४८ जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या कार्यान्वित आहेत. मागील वर्षी पुणे विभागात सर्वाधिक ५८ जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले. त्या खालोखाल मुंबई विभाग ४९, नागपूर विभाग ३५ आणि औरंगाबाद विभाग ६ असे मरणोत्तर अवयवदान झाले आहे. पुणे विभागात मागील तीन वर्षांपासून मरणोत्तर अवयवदानामध्ये वाढ होताना दिसत आहे.
मागील वर्षी पुणे विभागात ५८ जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले. त्यातून १५८ जणांना अवयव मिळाले. त्यातील मूत्रपिंडे ७४, यकृत ४३, हृदय ९, फफ्फुसे १०, मूत्रपिंड व स्वादुपिंड ८, मूत्रपिंड व यकृत २ आणि हृदय व फुफ्फुस १ अशा अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. पुणे विभागात २०२२ मध्ये ४६ जणांनी मरणोत्तर अवयवदान केले होते आणि त्यातून ११८ अवयव मिळाले होते. तसेच, २०२१ मध्ये ४४ जणांनी मरणोत्तर अवयदान केले होते आणि त्यातून ९७ अवयव मिळाले होते, अशी माहिती पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
राज्यातील विभागनिहाय मरणोत्तर अवयवदान (२०२३)
मुंबई – ४९
पुणे – ५८
नागपूर – ३५
छत्रपती संभाजीनगर – ६
एकूण अवयवदान – १४८
मरणोत्तर अवयवदान वाढावे यासाठी रुग्णालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचे पाऊल आम्ही उचलले होते. करोना संकटाच्या काळात हा उपक्रम बंद झाला होता. तो पुन्हा सुरू करण्यात आला असून, रुग्णालयांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवयवदानात वाढ झालेली दिसून येत आहे.
-आरती गोखले, समन्यवक, पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती
मागील काही काळापासून आपण रुग्णालयांना अवयवदानासाठी सर्वतोपरी मदत करीत आहोत. त्यांना अनेक वेळा तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे येतात. अशा वेळी आम्ही पुढाकार घेऊन त्यांना मदत करतो. त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे. भविष्यात अवयवदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-डॉ. शीतल महाजनी, सचिव, पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती