पुणे : पावसाळा संपून मोसमी पावसाचा जोर कमी होताच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ जाणवू लागली आहे. शुक्रवारी विदर्भात पारा ३५ अंश सेल्सिअसवर, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३३ ते ३४ आणि किनारपट्टीवर पारा ३३ अंश सेल्सिअसवर गेला आहे. गुरुवारी अलिबागमध्ये सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (३ ऑक्टोबर) अलिबाग येथे सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रुज, कुलाबा, हर्णे आणि डहाणूत पारा सरासरी ३३ अंशांवर होता. मध्य महाराष्ट्रात जळगावात ३४.२ अंश सेल्सिअस तापमान होते. मालेगाव, सोलापूरमध्ये पारा ३३ अंशांवर होता. मराठवाड्यात परभणीत ३४.४ तर अन्यत्र सरासरी ३३ अंशांवर पारा होता. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत पारा ३५ शी पार गेला आहे. अकोला ३५.८, चंद्रपूर ३६.०, गडचिरोली ३५.०, नागपूर ३५.६, वर्धा ३५.० आणि अन्य जिल्ह्यांत पारा सरासरी ३४ अंशांवर होता.
पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आकाश अनेक ठिकाणी निरभ्र झाले आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे. दुपारी बारा – एक वाजण्याच्या दरम्यान असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सहा ते दहा ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा सर्वदूर पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील तीन – चार दिवसांत पुन्हा पारा खाली येण्याचा अंदाज आहे. साधारण १५ ऑक्टोबरनंतर ऑक्टोबर हीटचा उकाडा वाढण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा – दहावीच्या परीक्षेचे अर्ज कधीपासून भरता येणार? राज्य मंडळाने दिली माहिती
तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज
राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी (४ ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व मराठवाड्यात. शनिवार, रविवार आणि सोमवारी राज्याच्या बहुतेक भागांत दिवसभर उन्हाचा चटका वाढून सायंकाळी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.