पुणे : महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरतीसाठी आलेल्या अर्जांचा जिल्हानिहाय तपशील जाहीर करण्यात आला. त्यानुसार पुणे, रायगड या जिल्ह्यांतून सर्वाधिक अर्ज दाखल झाले असून, तर मुंबई शहर आणि वाशिम जिल्ह्यांतून सर्वांत कमी अर्ज आले.
भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी ही माहिती दिली. टीसीएस या खासगी कंपनीमार्फत तलाठी भरती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील जिल्ह्यांतून मिळून एकूण १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज दाखल झाले आहेत. उच्च शिक्षित उमेदवारांनीही या परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेचे नियोजनही करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>धक्कादायक: पिंपरी चिंचवडमध्ये ब्लेडने वार करून मित्राची हत्या; गुप्तांग कापून मृतदेह विहिरीत फेकला
तलाठी भरती परीक्षेसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झालेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक एक लाख १४ हजार ६८४, रायगड जिल्ह्यातून १ लाख ५३७, नाशिक जिल्ह्यातून ६८ हजार ३८, अहमदनगर जिल्ह्यातून ६१ हजार ६३३, सोलापूर जिल्ह्यातून ५८ हजार ९७७, नागपूर जिल्ह्यातून ५७ हजार ८७२, चंद्रपूर जिल्ह्यातून ५६ हजार ९३० अर्ज दाखल झाले.
हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमधील कचऱ्याची समस्या होणार गंभीर… ‘हे’ आहे कारण
तर सर्वांत कमी अर्ज दाखल झालेल्या जिल्ह्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातून २ हजार ६३६, मुंबई शहरातून ३ हजार ७९३, अकोला जिल्ह्यातून ६ हजार ४०४ मुंबई उपनगरातून ७ हजार ६८९, लातूर जिल्ह्यातून ८ हजार ३१, गडचिरोली जिल्ह्यातून ९ हजार २०, गोंदिया जिल्ह्यातून ९ हजार ३३० अर्ज दाखल झाले.