दिल्ली येथील ट्विन टॉवर ही इमारत १२ सेकंदात ईडीफाईस कंपनीने पाडली होती. ती इमारत पडतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याच कंपनी मार्फत पुण्यातील चांदणी चौकातील पुलास रविवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट करण्यात आला. मात्र, संपूर्ण पूल पडला नाही. पुलाचा केवळ मध्यभाग पडला आणि दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे एनएचएआय आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. तसेच या स्फोटाच्या यशस्वीतेवरच प्रश्न उपस्थित केला जात आहेत. सोशल मीडियावर मीम्सद्वारे यावर निशाणा साधला जात आहे. १ हजार ३५० डिटोनेटरच्या स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे का पडला नाही यावर अधिकारी आनंद शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आनंद शर्मा म्हणाले, “ज्यावेळी हा पूल बांधण्यात आला त्यावेळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर केला गेला. आम्हाला त्या स्टीलचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्फोटानंतर पुलाचा काही भाग शिल्लक राहिला.”
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले, “चांदणी चौकातील पूल १ वाजून ७ मिनिटांनी स्फोट घडवून पाडला. मात्र ज्यावेळी पूल बांधण्यात आला होता त्यावेळी स्टीलचे प्रमाण अधिक वापरले गेले. त्यामुळे पुलाचा राडारोडा बाजूला करण्यास वेळ गेला आहे. आम्ही सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी सर्वासाठी खुला होईल असे नियोजन केले होते. मात्र, सध्याची स्थिती लक्षात घेता १० वाजेपर्यंत रस्ता खुला होईल.
एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर उत्कर्ष मेहता म्हणाले होते, “रात्री २ वाजून ३३ मिनिटांनी चांदणी चौकातील संपूर्ण पूल पाडण्यात आला. आम्ही १०० टक्के पूल पाडण्यात यशस्वी झालो आहोत. आम्हाला पूल पाडण्यात ब्लास्टचा फायदा झाला आहे. तसेच आता राडारोडा काढण्याच काम सुरू आहे. सकाळी ८ च्या पूर्वी आमचे काम पूर्ण होईल.”
नेमकं काय घडलं?
दरम्यान, चांदणी चौकातील पूल पाडण्याआधीच प्रशासनाने सायंकाळ ६ वाजल्यापासून पूल परिसरातील २०० मीटर परिसर निर्मनुष्य करण्यास सुरुवात केली होती. तसेच कलम १४४ लागू करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ११ नंतर वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला. त्याचवेळी पुलाच्या दोन्ही बाजूने भल्या मोठ्या पांढर्या पडद्याने संपूर्ण भाग झाकला. जेणेकरून पूल पाडताना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये.
हेही वाचा : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख
रात्री १ वाजता स्फोट झाला आणि अगदी काही सेकंदात पुलाचा मध्यभाग खाली आला. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे संपूर्ण पूल सहा सेकंदात जमीनदोस्त केला जाणार हा कंपनी आणि प्रशासनाचा दावा फोल ठरला. पूल न पडल्याने पोकलेनच्या मदतीने दोन्ही बाजूने पूल पाडण्यात आला. त्यात वेळ गेल्याने सकाळी ८ वाजता वाहतूक पूर्ववत करण्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे नियोजनही कोलमडले. यामुळे रविवारी (२ ऑक्टोबर) सकाळी दोन्ही बाजूने तब्बल १० किलोमीटरपर्यंत जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, सकाळी १० नंतर मुंबई-बंगळुरू मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.