नारळीपोफळीच्या बागा, नयनरम्य समुद्र किनारे, गडकिल्ले, सागरीदुर्ग.. यातून खुलणारे कोकणचे सौंदर्य पाहण्याबरोबरच कोकणचा इतिहास, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आदींची अनुभूतीही आता पर्यटकांना घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ व प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशनच्या वतीने ‘कोकण अनलिमिटेड’ ही सहलींची शृंखला आयोजित करण्यात आली असून, त्या माध्यमातून पर्यटकांना कोकणचे हे अनोखे दर्शन घडविण्यात येणार आहे.
महामंडळाच्या विभागीय अधिकारी नयना गुरव-बोंदार्डे व प्रसन्न पर्पलचे प्रसन्न पटवर्धन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. कोकणचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक तेथे सहलीला जात असतात. निसर्गाने सौंदर्याच्या केलेल्या मुक्त उधळणीमुळे कोकणची भुरळ अनेकांना पडते. मात्र, कोकण येथील पर्यटनस्थळांबरोबरच तेथील इतिहास, परंपराही वैशिष्टय़पूर्ण आहेत. ‘कोकण अनलिमिटेड’ च्या माध्यमातून या वैशिष्टय़ांचेही दर्शन पर्यटकांना मिळू शकणार आहे.
पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या ठिकाणांहून पर्यटकांसाठी या सहली आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातून दर सोमवारी ही सहल काढली जाणार आहे. पाच नोव्हेंबरला पुण्यातून पर्यटकांना पहिला गट या अनोख्या सहलीसाठी निघणार आहे. सहलीमध्ये गणपती पुळे, पावस, भाटय़े समुद्रकिनारा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, मालवण, तारकर्ली, कुणकेश्वर, वेंगुर्ला, रेड्डीचा गणपती व सावंतवाडी आदी स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. त्यात साहसी पर्यटन, खाद्यसंस्कृती, खेळ, सण व परंपरेचा अनुभवही पर्यटकांना मिळू शकणार आहे. संस्कृती व परंपरा आदी विषय व वेगवेगळ्या संकल्पना घेऊन सहली काढण्यात येणार आहेत. त्यातून पर्यटकांबरोबरच अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनाही नवनवीन अनुभव घेता येणार आहेत. या सहली आरामदायी व्होल्व्हो गाडीतून काढण्यात येणार असून, या गाडीची क्षमता ४३ आसनांची आहे. त्याचप्रमाणे या गाडीमध्ये स्वच्छतागृहाचीही व्यवस्था असणार आहे. सहली व त्यांच्या आरक्षणाबाबतची सर्व माहिती http://www.kokanunlimited.comया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा