पुणे : कोल्हापूरमधील शेतकरी आधीपासून एका डोळ्याने अंध होता. शेती करताना झालेल्या गंभीर अपघातानंतर त्याला दुसऱ्या डोळ्यानेही दिसणे बंद झाले. त्यामुळे त्याला उपचारासाठी पुण्यात आणण्याल आले. डॉक्टरांनी अत्याधुनिक पद्धतीने त्याच्या डोळ्यावर उपचार केल्याने त्याला पुन्हा एका डोळ्याने दिसू लागले आहे.कोल्हापूरमधील हा शेतकरी काही वर्षांपासून डाव्या डोळ्याने अंध होता. शेतीचे काम करीत असताना त्याच्या उजव्या डोळ्यावर हातपंपाचा जोरदार आघात होऊन गंभीर इजा झाली. यामुळे त्याला उजव्या डोळ्यानेही दिसणे बंद झाले. त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याची स्थिती गंभीर असल्याने तेथून त्याला पुण्यातील एशियन आय हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या डोळ्याची तपासणी केली. त्यावेळी डोळ्याच्या बाह्य पटलाला खोल जखमा, छिद्र, संसर्ग, रक्तस्राव, मोतीबिंदू अशा गुंतागुंतीच्या समस्या आढळून आल्या. याचबरोबर त्याच्या डाव्या डोळ्यात पूर्वीपासून असलेली अंधत्वाची स्थिती निदर्शनास आली.
डॉ. वर्धमान कांकरीया आणि त्यांच्या पथकाने तातडीने रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेत डोळ्याच्या जखमांना टाके घालण्यात आले. बायोलॉजिकल ग्लू (सायनोक्रिलेट) वापरून डोळ्यातील छिद्रे बुजवण्यात आली. याचबरोबर डोळ्यातील रक्त स्राव काढून टाकण्यात आला. डोळ्यातील संसर्ग नियंत्रणासाठी प्रभावी औषधोपचार करण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांत रुग्णाची दृष्टी २० टक्क्यांपर्यंत सुधारली. त्याच्या डोळ्यातील टाके तीन महिन्यांनी काढण्यात आले आणि चार महिन्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याच्या दृष्टीची तीव्रता ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली. पुढील उपचारांमध्ये विशेष स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्स बसवल्याने त्याची दृष्टी ८० टक्क्यांपर्यंत सुधारली. दृष्टी सुधारल्यामुळे हा शेतकरी पुन्हा कोणाच्याही आधाराशिवाय त्याची कामे करू लागला आहे. शेतीची कामेही तो करीत आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी त्याला संरक्षक चष्माही डॉक्टरांनी दिला आहे.

रुग्णाच्या एका डोळ्यात आधीपासून अंधत्व होते. त्यामुळे दुसरा डोळा वाचवणे त्याच्या पुढील आयुष्य सामान्यपणे जगण्यासाठी आवश्यक होते. तातडीच्या शस्त्रक्रिया, बायोलॉजिकल ग्लू, संसर्ग नियंत्रण आणि विशेष लेन्स यांच्या मदतीने त्याला कार्यक्षम दृष्टी मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. डॉ. वर्धमान कांकरीया, नेत्रशल्यचिकित्सक