राज्यभरात प्राथमिक (चौथी) आणि पूर्व माध्यमिक (सातवी) स्तरावर घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले असून यावर्षी कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची सरशी झाली आहे. चौथीच्या परीक्षेत ग्रामीण भागामध्ये सात विद्यार्थ्यांना ३०० गुण मिळाले आहेत.
राज्यभरात दरवर्षी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. एकूण ३०० गुणांची ही परीक्षा असते. या परीक्षेचे निकाल गुरुवारी दुपारी ३ नंतर संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.
सातवीच्या परीक्षेमध्ये ग्रामीण भागामध्ये सोलापूर येथील निशिगंधा चव्हाण आणि कोल्हापूर येथील वृषाली पाटील या विद्यार्थिनी २८८ गुण मिळवून पहिल्या आल्या आहेत. शहरी भागामध्ये साताऱ्यातील प्रज्ञा जाधव ही विद्यार्थिनी २८८ गूण मिळवून प्रथम आली आहे. चौथीच्या परीक्षेमध्ये ग्रामीण भागात सात विद्यार्थ्यांनी ३०० गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील वसुंधरा देसाई, संजना जाधव, श्रेया पाटील, सानिका खाडे, नागेश भोगले, आदित्य पाटील आणि सांगली येथील सुयश कांबळे हे विद्यार्थी प्रथम स्थानावर आहेत. चौथीच्या परीक्षेत शहरी भागामध्ये कोल्हापूर येथील पीयूष कामत हा विद्यार्थी ३०० गुण मिळवून पहिला आला आहे.
यावर्षी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षांसाठी चौथीचे ९ लाख ७७ हजार विद्यार्थी बसले होते, तर सातवीचे ६ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राज्यभरात चौथीची परीक्षा ५ हजार ४३८ केंद्रांवर आणि सातवीची परीक्षा ३ हजार ७५४ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर लॉग इन करून प्रवेश पत्राचा क्रमांक टाकायचा आहे. www.mscepune.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा