बारामतीच्या कोमल गवारे या विद्यार्थिनीने संस्कृत, गणित, विज्ञान या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवीत तब्बल चौदा बक्षिसे मिळवली आहेत. पुणे विभागीय मंडळाकडून दहावीच्या परीक्षेत पारितोषिके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.  पुणे, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्य़ांत या वर्षी पुणे जिल्ह्य़ानेच आघाडी घेतली असून ७ विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली आहेत.
पुणे विभागांत विषयानुसार पारितोषिके पटकावण्यात या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यम प्रशालेतील कोमल गवारे या विद्यार्थिनीने तब्बल १४ पारितोषिके पटकावली आहेत. तिला संस्कृत, गणित आणि विज्ञान या तिन्ही विषयांत शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहेत. मराठी भाषा विषयाची सर्व पारितोषिके खेड तालुक्यातील ज्ञानदीप विद्यालयाच्या संचिता गदादे (९६ गुण) हिला मिळाली आहेत. संचिताने ११ पारितोषिके पटकावली आहेत.
गुजराथी प्रथम भाषा विषयात कसबा पेठेतील आर. सी. मेहता गुजराथी हायस्कूलची विद्यार्थिनी ऊर्मिला रावरीया (गुण ९२) हिला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. समाजशास्त्र विषयाचे पारितोषिक (गुण ९८) कर्वेनगर येथील अभिनव विद्यालयाच्या ऋग्वेद वाकचौरे याला मिळाले आहे. रात्रशाळा विभागामध्ये इंग्रजी विषयात प्रथम येण्याचा मान चिंचवड येथील चिंतामणी रात्र प्रशालेचा विद्यार्थी सागर कांबळे (गुण ७६) याने पटकावला आहे. निगडी येथील पीईएस मॉडर्न हायस्कूलच्या वैष्णवी राहाणे (गुण ९८) ही इंग्रजी विषयात मुलींमध्ये प्रथम आली आहे.
या वर्षी पुणे जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावली आहेत. नगर जिल्ह्य़ाला ५ तर सोलापूर जिल्ह्य़ातील एका विद्यार्थ्यांला पारितोषिक मिळाले आहे.

Story img Loader