पुणे : खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करुन कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. पोलीस ठाण्यातील प्रिंटर आपटून नुकसान केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांविरुद्ध अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी एका तरुणीसह तिचे आई-वडील आणि अल्पवयीना भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस शिपाई शिल्पा पवार यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वानवडी बाजार परिसरात राहायला आहेत. कोंढवा पोलिसांनी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तिला तपासासाठी कोंढवा पाेलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तरुणी, तिचे वडील, आई आणि १४ वर्षांचा भाऊ मंगळवारी सायंकाळी कोंढवा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी हुज्जत घातली.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?

हेही वाचा – शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता

पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई अक्षया भुजबळ यांनी तरुणीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तिने पोलीस शिपाई भुजबळ यांच्या हाताचा चावा घेतला. त्यांना ओरखडले. तरुणीच्या आईने त्यांच्या पोटात लाथ मारली. पोलीस शिपाई पवार यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. ‘आमच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्तांकडे तक्रार करुन तुमची नोकरी घालवितो’, अशी धमकी त्यांनी दिली. पोलीस ठाण्यातील प्रिंटर जमिनीवर आपटून नुकसान केले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मोहसीन पठाण तपास करत आहेत.

Story img Loader