Koregaon Bhima Shaurya Din : आज नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तर दुसरीकडे कोरोगाव भीमा या ठिकाणी आज (१ जानेवारी) २०७ वा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आणि परराज्यातून देखील लाखो अनुयायी दाखल झाले आहेत. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केलं आहे. या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं. दरम्यान, विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींच्या संख्येत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात अनुयायी अभिवादन सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत.

हेही वाचा : भीमा- कोरेगाव: १८१८ साली आजच्या दिवशी नेमके काय घडले होते? गॅझेटियर काय सांगते?

अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. भीमा कोरेगावचा जो संघर्ष आहे तो शारीरिकरित्या संपला असला तरी मानसिकरित्या अजूनही सुरु आहे असं मी मानतो. या देशात जोपर्यंत मानसिक संघर्ष सुरू राहील, तोपर्यंत मानवतेच्या दृष्टीकोणातून जे-जे स्तंभ आहेत, त्या विजयस्तंभाला लोक अभिवादन करण्यासाठी येत राहतील”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच नवीन वर्षांच्या सर्वांना शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, कोरोगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राजकीय नेते येत असतात. आज सकाळी प्रकाश आंबेडकर, मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिवादन केलं. तसेच दिवसभरात विविध राजकीय नेते मंडळी देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून सुविधांचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koregaon bhima 207 shaurya din excitement on the occasion of 207th shaurya day in koregaon bhima lakhs of followers throng to salute vijaystambha gkt