पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी (३१ डिसेंबर) सायंकाळपासूनच अनुयायांची गर्दी झाली. राज्यातील वेगवेगळ्या भागांतून अनुयायी पेरणे फाटा येथे दाखल होऊन विजयस्तंभाला मानवंदना देत आहेत. दरम्यान, अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘विजयस्तंभ सुविधा’ हे अॅप विकसित करण्यात आले आहे. तसेच, अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी असे दोन दिवस देश आणि राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात. गेल्या काही वर्षांपासून अनुयायांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, यंदा दहा लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज सामाजिक संघटनांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अनुयायांसाठी मोफत बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, ज्येष्ठांसाठी निवारा कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचे पाणी, पोलीस मदत कक्ष, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांचा लाभ सहज घेता यावा आणि सुविधांपर्यंत अनुयायांना लवकरात लवकर पोहोचता यावे, यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘विजयस्तंभ सुविधा’ हे अॅप विकसित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे : कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे

जिल्हा प्रशासनाकडून सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकारी आणि १७ समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, सोहळ्यातील सुरक्षेच्या दृष्टीने आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

पूर्वसध्येपासून अनुयायी येण्यास सुरुवात

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, मंगळवारी (३१ डिसेंबर) रात्री पेरणे फाटा येथपासून विजयस्तंभ परिसरात अनुयायांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. पेरणे फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायांनी हातात झेंडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन परिसर घोषणांनी दुमदुमून टाकला.

कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळा उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाहतूक, अनुयायांसाठी मोफत बससेवा, पिण्याचे पाणी, शौचालय, स्वतंत्र दर्शन रांग, वाहनतळ आणि इतर सुविधांसोबत सुरक्षिततेच्या अनुषंगाने विशेष नियोजन करण्यात आले आहे. अनुयायांनी विजयस्तंभाला सुरक्षित अभिवादन करून प्रशासनाला मदत करावी. – डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koregaon bhima battle anniversary pune print news news vvp 08 amy