पुणे : कोथरूड परिसरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर समस्त कोथरूड ग्रामस्थांकडून चौका-चौकांत फलक लावण्यात आले आहेत. ‘कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा’ अशा आशयाचे फलक लावून कोथरूडमधील गुन्हेगारीला चाप बसवा, तसेच जयंती, उत्सवाच्या नावाखाली सुरू असलेले गैरप्रकार राेखण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
याबाबत समस्त गावकरी मंडळींकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले. ग्रामस्थांकडून कोथरूड पोलीस ठाणे, तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.
कोथरूड भागातील भेलकेनगर चौकात शिवजयंतीच्या दिवशी (१९ फेब्रुवारी) संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गुंड गजा मारणे टोळीतील सराइतांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गजा मारणेसह पाच जणांना अटक केली. ही घटना ताजी असतानाच कोथरुड भागातील शास्त्रीनगर परिसरात वैमनस्यातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करून कोयता, तलवारीने वार करण्यात आले. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कोथरूड परिसरात एकापाठोपाठ दोन गुन्हे घडल्याने परिसरात घबराट उडाली आहे.
कोथरुड हे ४० वर्षांपूर्वी गाव होते. मूळ ग्रामस्थ गावात वास्तव्यास होते. गेल्या २५ ते ३० वर्षांत कोथरूडचा कायापालट झाला. वेगाने वाढणारे उपनगर म्हणून कोथरूड उदयास आले. निवृत्तीनंतर अनेकांनी कोथरूड भागात वास्तव्यास पसंती दिली. पुण्यासह मुंबईतील अनेक जण कोथरूड परिसरात वास्तव्यास आले. या भागात कष्टकरी, श्रमजिवी वास्तव्यास आले. जय भवानीनगर, केळेवाडी, किष्किंदानगर, शास्त्रीनगर, सुतारदरा परिसरातील वसाहतीत कष्टकरी वास्तव्यास आहेत. या भागातील वर्चस्वाच्या वादातून गुंड टोळ्यांमध्ये संघर्ष उडाला आणि गेल्या काही वर्षांपासून कोथरूडचे नाव गुन्हेगारी घटनांमुळे नाहक बदनाम झाले, असे समस्त कोथरुड ग्रामस्थ मंडळींकडून सांगण्यात आले.
कोथरुडच्या शांततेला गालबोट लावण्याचे काम ग्रामस्थांनी कधीच केले नाही. या भागातील गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचे काम काही राजकीय नेत्यांनी केले. ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून उत्सव, जयंती साजरी करण्याची प्रथा वाढीस लागली. गुंडाचे फलक परिसरात लावले जातात. गुंड टोळ्यांचे म्होरके समाज माध्यमात चित्रफिती प्रसारित करतात. गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत, असे आरोप कोथरुड ग्रामस्थ मंडळींकडून करण्यात आले आहेत.