कोथरूड भागात एका संगणक अभियंता तरुणाला गुंड टोळीतील सराइतांनी मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर, ‘पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे,’ अशी सूचना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. मितभाषी असलेले मोहोळ आक्रमक झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

महिनाभरात शहर परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या. येरवडा, कसबा पेठेतील कागदीपुरा, बिबवेवाडी भागात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना तोडफोड करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करा, त्यांची धिंड काढा, असा आदेश जाहीर कार्यक्रमात दिला. पवार यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून नाराजी व्यक्त करून, ‘पोलीस आयुक्त काय करतात,’ असाही सवाल उपस्थित केला होता.

वाहन तोडफोड, तसेच शहरात दहशत माजविण्याच्या घटना सुरू असताना, बुधवारी (१९ फेब्रुवारी) कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरात संगणक अभियंता तरुण देवेंद्र जोग यांना टोळक्याने मारहाण केली. भेलकेनगर परिसरातून मिरवणूक जात असताना दुचाकीस्वार जोग यांना किरकोळ वादातून मारहाण झाली. जखमी अवस्थेतील जोग यांनी कोथरूड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

मारहाण करणारे चौघे जण कोथरूड भागातील गुंड गजा मारणे टोळीशी संबंधित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आता खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. जोग हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. किरकोळ वादातून जोग यांना गुंड टोळीतील सराइतांनी बेदम मारहाण केल्याची घटना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कानावर गेली. त्यानंतर मोहोळ यांनी संताप व्यक्त करून गुंडांविरुद्ध कडक कारवाईचा आदेश दिला. केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी लगोलग मारणे टोळीतील तीन सराइतांना अटक केली. या घटनेनंतर मोहोळ प्रसारमाध्यमांना सामाेरे गेले आणि शांत, मितभाषी असलेले मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आक्रमक पवित्रा घेतला. गुंडांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करून शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर, ‘पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे,’ अशी सूचना त्यांनी केली.

समाज माध्यमात गुंड टोळ्यांचे म्होरके चित्रफिती प्रसारित करतात. ‘पोलीस आयुक्तांना हे दिसत नाही का?,’ असा सवालही मोहोळ यांनी उपस्थित केला. ‘मारहाण झालेले जोग भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून मी आवाज उठवला नाही. कुठल्याही पुणेकराच्या बाबतीत अशी घटना घडल्यास मी आवाज उठवीन,’ असे मोहोळ यांनी नमूद केले.

मुळात पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी घटना वाढत आहेत. गुन्हेगारी घटनांचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांविरुद्ध कारवाई केली. ‘मकोका’, ‘एमपीडीए’ कारवाईनंतरही शहरातील गुन्हेगारी घटना थांबल्या नाहीत. दिवसाआड दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. गुंड टोळ्यांचे म्होरके समाज माध्यमात चित्रफिती प्रसारित करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहराच्या प्रत्येक भागात असलेल्या अशा गुंड टोळ्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून पोलिसी खाक्या दाखविल्यास शहरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात चाप बसू शकतो.

मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीने आवाज उठवला, हे चांगलेच! लोकप्रतिनिधी लोकांच्या बाजूचेच हवेत. पण, या जोडीने सामान्य जनांच्या मनात असलेल्या एका प्रश्नाचे उत्तरही मिळायला हवे. निवडणूक आल्यावर कोणी तरी राजकीयदृष्ट्या फायद्याचा आहे, म्हणून त्याला अभय द्यायचे आणि त्यासाठी पोलिसांवर दबाव आणायचा, असे आता नक्की होणार नाही ना? मतांची जुळवाजुळव करण्यासाठी हात आखडता घेतला गेला, असे होणार नाही ना?

हे प्रश्न उपस्थित होतात, कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांनी राजकीय पक्षात यापूर्वीही प्रवेश केले होते आणि पूर्वाश्रमीचे गुन्हेगार राजकारणात उजळ माथ्याने वावरले होते. त्यावरून राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावर अनेकदा चर्चा झाली आहे, होते आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी या व्यापक विषयावर आत्मपरीक्षण केले तर बरे!

rahul.khaladkar@expressindia

Story img Loader