पुणे : शहरातील भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ‘सत्ताकेंद्र’ असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाची मक्तेदारी संपुष्टात आली असून भाजपसाठी कोथरूड आता नवे सत्ताकेंद्र झाले आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि पालकमंत्री, विद्यमान मंत्र्यांबरोबरच शहर मध्यवर्ती कार्यालयही कोथरूड विधानसभा मतदारसंघात असल्याने शहर भाजपची सूत्रे कोथरूडमधूनच हलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत शहर भाजपचा कारभार कसबा विधानसभा मतदारसंघातून चालत होता. कसबा विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिलेले दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्याकडे शहराची सर्व सूत्रे होती. तांबडी जोगेश्वरी येथील कार्यालयातून कामकाज पाहिले जात होते. ऑक्टोबर २०१९ च्या निवडणुकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड येथून उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोथरूड नवे सत्ताकेंद्र होण्याच्या दृष्टीने बीजे रोवली गेली. या मतदारसंघातून आमदार आणि पुढे पालकमंत्री झाल्यानंतर शहराची सूत्रे पाटील यांच्या हाती राहिली. बापट यांच्या निधनानंतर तर गेल्या वर्षभरात कोथरूडचे महत्त्व अधोरेखित झाले.
हेही वाचा…लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने निश्चित केले महत्त्वाचे उद्दिष्ट; २०४७ पर्यंत काय साध्य करणार?
विद्यमान खासदार मुरलीधर मोहोळ हे कोथरूडमधील आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद आणि महापौरपदही देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीसाठी मोहोळ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अन्य भागावर अन्याय का, अशी विचारणा करत काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तत्पूर्वी कोथरूडच्या माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरही याच मतदारसंघातील आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या पालकमंत्री पद नसले तरी, ते राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे सध्या दोन खासदार, एक माजी केंद्रीय आणि राज्यातील मंत्री कोथरूडमधील आहे.
हेही वाचा…पुणे : विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू, बालेवाडी भागातील दुर्घटना
गेली कित्येक वर्षे तांबडी जोगेश्वरी येथील कार्यालयातून कामकाज चालत होते. मात्र, ती जागा अपुरी पडत असल्याने २०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी शिरोळे रस्त्यावर भाजप कार्यालय स्थलांतरित करण्यात आले. या कार्यालयातून भाजपने तीन ते साडेतीन वर्षे कारभार केला. त्यानंतर महापालिका भवनाजवळ कार्यालय हलविण्यात आले. ती जागाही अपुरी पडत असल्याचे सांगत डीपी रस्त्यावरील जागेत शहर कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या ही जागा भाडेकरारावर असली तरी, तेथेच नवी जागा घेऊन कायमस्वरूपी कार्यालय करण्याचे प्रयत्न भाजप नेत्यांकडून सुरू झाले आहेत.