पुणे : व्यावसायिकाकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड गजानन उर्फ गजा मारणे याची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी दिले.
व्यावसायिकाकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोथरुडमधील गुंड गजा मारणे याच्यासह साथीदारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. या प्रकरणी मारणे याच्यासह १८ साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासात मारणेविराेधात पोलिसांना ठोस पुरावा मिळाला नाही. याबाबतचा उल्लेख पोलिसांनी आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या दोषारोपपत्रात दाखल केला होता.
हेही वाचा – “संजय शिरसाटांना गल्लीतले काळं कुत्रेही…”, सुषमा अंधारेंची घणाघाती टीका
मारणेविरुद्ध ठोस पुरावे नाहीत. त्याचा खंडणी प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती मारणे याचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तीवादात केली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मारणे याची २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – पुणे : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख रुपये नुकसान भरपाई
मारणे याची कोथरुड परिसरात दहशत आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. खून प्रकरणात न्यायालयाने मारणे याची जामीनावर मुक्तता केली होती. त्या वेळी मारणे याच्या साथीदारांनी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून मोटारीतून फेरी काढली. तळाेजा कारागृह ते कोथरुडपर्यंत काढलेल्या फेरीत ३०० ते ४०० मोटारी होत्या. द्रुतगती मार्गावर मारणे टोळीतील सराइतांनी दहशत माजविली होती. याबाबतची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी मारणे आणि साथीदारांविरुद्ध कोथरुड, खालापूर, शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.