पुणे: सकाळीं फिरायला निघालेल्या महिलांना हेरून दागिने चोरणार्या चोरट्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील एक आरोपी हा परराज्यातील असून त्याच्यावर विविध प्रकारचे पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत.राकेश गोकुळ राठोड (वय २१, रा. जळगाव), आदित्य कुंडलिक माझिरे (व्य १९, रा. मुळशी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, दरोडयासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मध्यप्रदेशातील भारवकुवा पोलीस ठाण्यात त्याच्यावर वाहनचोरी, चैनचोरीचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून राठोडचा शोध घेण्यात येत होता.
कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरात सकाळीं फिरायला निगालेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोसाखळी दोघांनी हिसकावून नेल्याची घटना नूकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक बालाजी सानप, ज्ञानेश्वर मुळे, आकाश वाल्मिकी, विष्णू राठोड यांचे पथक आरोपींच्या मागावर होते. तांत्रिक तपासावरून गुन्हा राठोड आणि माझीरे यांनी केल्याचे निष्पन्न करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सोनसाखळी, मंगळसूत्र, मोबाइल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करून कोथरूड पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील, वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.