पुणे : शहरात कोयता गँगकडून दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविल्याची घटना घडली. पंधरा दिवसांपूर्वी सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुण्यातील संगणक अभियंता पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात
मयूर रंगनाथ आरडे (वय २२), रोहन उर्फ गायसोन्या राजू आरडे (वय २१), ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंढे (वय २३), जयेश उर्फ जयड्या दत्ता ढावरे (वय १८), वृषभ शंकर कांबळे (वय २३), अनिकेत उर्फ गुड्डूर रवींद्र शिंदे (वय २४), आकाश मनोज डाकले (वय २३), आदित्य उर्फ सँडी पद्माकर डाकले (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत माऊली शिंदे (वय १९) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माऊली आणि त्याचा मित्र मध्यरात्री तळजाई वसाहत परिसरात थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. तुम्ही या भागातील दादा झाला आहात का ? अशी bk विचारणा करुन आरोपींनी कोयते उगारले. परिसरातील एका टपरीची तोडफोड केली. नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. आम्ही या भागातील दादा आहोत. आमच्या नादी लागाल, तर जीवे मारू, अशी धमकी दिली. आरोपींनी कोयते उगारुन नागरिकांना धमकावले.