पुणे : शिवाजीनगर भागात पादचाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.
चंदु नंदू सरोदे (वय १९), सिद्धेश विश्वास शेंडगे (वय १८, दोघे रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिवाजीनगर भागातून पहाटे निघालेल्या पादचाऱ्याला अडवून सरोदे, शेंडगे आणि अल्पवयीन साथीदारांनी कोयत्याचा धाक दाखविला होता. पादचाऱ्याकडील मोबाइल संच चोरून ते पसार झाले होते. पोलिसांनी पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार सराेदे आणि शेंडगे यांना सापळा लावून महापालिका भवन परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा – राज्यात यंदा कांदा उत्पादन किती? जाणून घ्या अंदाज
हेही वाचा – कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित बडे, अविनाश भिवरे, राजकिरण पवार, रुपेश वाघमारे, सुदाम तायडे यांनी ही कारवाई केली.