लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: अप्पर इंदिरानगर-कोंढवा परिसरात एकावर हल्ला करुन पसार झालेल्या सराईत गुंड मंगेश माने याची कोंढवा पोलिसांनी धिंड काढली. माने याने ‘एस. एम. गँग’ नावाची टोळी सुरू करुन दहशत माजविली होती. त्याच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती.
मंगेश उर्फ मंग्या अनिल माने (वय २६, रा. सरगम चाळ, अप्पर इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.२७ मार्च रोजी माने आणि साथीदारांनी रोहित खंडाळे याच्यावर कोंढव्यातील साईनगर परिसरात कोयत्याने वार केले होते. या प्रकरणी मंगेश माने, सागर जाधव, पवन राठोड, सूरज पाटील, अभिजीत दुधणीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर माने पसार झाला होता. मानेच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता.
आणखी वाचा-पुणे: आंदेकर टोळीकडून तरुणावर कोयत्याने वार
कोंढव्यातील पाण्याच्या टाकीजवळ माने थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी सूरज शुक्ला आणि सुजित मदने यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावून मानेला पकडले. त्यानंतर मानेची कोंढवा-अप्पर इंदिरानगर परिसरातून पोलिसांनी धिंड काढली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, सतीश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, ज्योतीबा पवार आदींनी ही कारवाई केली.