पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गेल्या महिनाभरापासून कोयता गँगचे गुन्हे काहीसे कमी झाले असताना पर्वती गाव परिसरात कोयता गँगने पुन्हा दहशत माजविली. आरोपींनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी नवनाथ वाडकर आणि शेखर वाघमारे (दोघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयुष चव्हाण (वय २१, रा. आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. आयुष, त्याचे मित्र अश्विन रेणुसे, मुसा पटेल दुचाकीवरुन पर्वती पायथा परिसरातून निघाले होते. आरोपी नवनाथची अश्विन रेणुसे याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती.

आरोपी नवनाथ, शेखर यांनी दुचाकीवरुन निघालेले आयुष, अश्विन, मुसा यांना अडवले. आयुष याच्यावर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात आयुष गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी पकडले. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करत आहेत.

Story img Loader