लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शहरात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. कोयता गँगमधील सराईत गुन्हेगार हे वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवित आहेत. वारजे भागात कोयता गँगने दहशत माजविली असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली.
या भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहमंत्र्यांनी आदेश द्यावेत, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यापासून पुणे शहर परिसरात नागरिकांच्या गाड्या फोडणे, धमकावून मारहाण करणे, दहशत माजविण्याचे प्रकार सुरु आहेत. वारजे भागात कोयता गँगने दहशत माजविली आहे. दहशतीच्या घटनांची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली.
पुणे शहर, परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. गृहमंत्र्यांनी लक्ष घालून पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावे, असे सुळे यांनी सांगितले.