पुणे : सिंहगड रस्ता परिसरात कोयता गँगने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने एका अल्पयवयीन मुलासह तिघांवर वार केले. परिसरातील नागरिकांवर कोयते उगारून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका अल्पवयीन मुलाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अमन झारेकर, समीर हातांगळे, अभिजित पाटील, प्रमोद कळंबे, आदित्य खरात यांच्यासह साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्र आदेश म्हस्के दोन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास सायकलचे पंक्चर काढण्यासाठी निघाले होते. त्या वेळी टोळक्याने दोघांना अडवले. त्यावरून झालेल्या वादातून आराेपी अमन आणि साथीदारांनी आदेश आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. आदेश तेथून पळाला. आरोपींनी आदेशबरोबर असलेल्या अल्पवयीन मित्रावर कोयत्याने वार केले.

हेही वाचा- पिंपरी : गृहनिर्माण सोसायटीत आयपील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे जेरबंद

त्या वेळी नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर कोयते उगारून दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे तपास करत आहेत. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील महालक्ष्मी बिल्डींगच्या मागे असलेल्या कॅनोल रस्त्यावर घडली. गणेश अडागळे, नागेश शेट्टी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अडागळे (वय ३०, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अमन झारेकर याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पिंपरी : कापड दुकानदाराला खंडणी मागत दुकानासह जाळून टाकण्याची धमकी देणारा गजाअड

अडागळे आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या कारणावरून आरोपींनी कॅनोल रस्त्यावर अडागळे आणि त्याचा मित्र शेट्टी याला अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले, तसेच परिसरात दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyta gang terror in sinhagad road area attack on three including minors pune print news rbk 25 ssb