पुणे : पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आता फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविले आहे. जगभरातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांना केपीआआयटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरविते. याआधी पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे यांनी या यादीत स्थान मिळविले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंडित हे सध्या केपीआयटीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. केपीआयटीचे बाजारभांडवल ४० हजार ५०० कोटी रुपये आहे. कंपनीकडून बीएमडब्ल्यू, होंडा, फोर्ड आणि जनरल मोटर्स यासारख्या जागतिक पातळीवरील वाहननिर्मिती कंपन्यांना सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरविली जातात. सध्या कंपनीत १२ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून, युरोप, अमेरिका, जपान, चीन, थायलंडमध्ये कंपनीची कार्यालये आहेत.

हेही वाचा >>>पुण्यात वाढलेला मतटक्का कोणत्या ‘लाटे’चा परिणाम? ‘कसब्या’त सर्वाधिक, तर ‘शिवाजीनगर’मध्ये सर्वांत कमी मतदान

पंडित यांची संपत्ती १.२ अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षभरात केपीआयटीच्या समभागात तेजी दिसून आली आहे. भांडवली बाजारात कंपनीच्या समभागात झालेल्या वाढीमुळे फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या २०२४ च्या यादीत पंडित यांनी स्थान पटकावले आहे. गेल्या चार वर्षांत भांडवली बाजारात केपीआयटीच्या समभागात ३ हजार ६०० टक्के वाढ झाली आहे. केवळ गेल्या वर्षी समभागात ८२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी कंपनीचा महसूल १ हजार ५१६ कोटी रुपये तर नफा २८० कोटी रुपये होता.

हेही वाचा >>>महागलेल्या लिंबांच्या दरात अचानक घसरण का झाली?

सनदी लेखापाल ते आयटी क्षेत्र

रवी पंडित हे सनदी लेखापाल असून, त्यांच्या वडिलांचा सनदी लेखापाल सेवा कंपनी होता. हा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्याची त्यांची महत्वकांक्षा होती. यासाठी त्यांनी एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर ते भारतात परतले. नंतर त्यांनी वडिलांच्या कीर्तने पंडित कंपनीचे रुपांतर हळूहळू माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपनीत करण्यास सुरूवात केली. त्यामुळे पुढे कंपनी केपीआयटी टेक्नॉलॉजीज या नावाने नावारूपास आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kpit technologies chairman ravi pandit named in forbes list of world billionaires pune print news stj 05 amy