उत्खननाच्या क्षेत्रात जगभरात मोठी प्रगती व बदल झाले आहेत. या क्षेत्रामध्ये जगभरात नव्या पद्धती वापरून नवे शोध लागत आहेत. मात्र दुर्दैवाने भारतात या नव्या पद्धतींचा योग्य पद्धतीने वापर होत नाही, अशी खंत ज्येष्ठ पुरातत्व संशोधक व लेखक डॉ. मधुकर ढवळीकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या स्मृतिप्रित्यार्थ दिला जाणारा ‘कृष्ण मुकुंद पुरस्कार’ ढवळीकर यांना त्यांच्या ‘महाराष्ट्राची कूळकथा’ या संशोधनपर ग्रंथाला देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन तसेच मोहन गुजराथी, सुधीर उजळंबकर आदी त्या वेळी उपस्थित होते.
ढवळीकर म्हणाले, उत्खननामध्ये पूर्वी केवळ वृत्तांत प्रसिद्ध होत होते. काय सापडले याची जंत्री मांडण्यात येत होती. त्यामुळे लोक या विषयाला कंटाळत होते. सध्या या क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या कक्षा वाढत आहेत. पुरातत्व शास्त्रामध्ये आता मोठी प्रगती झाली आहे. पूर्वी काय घडले हे उत्सखनातून सांगीतले जायचे, मात्र आता हे का घडले, हे सांगता येते. उत्खननातून मोठे पुरावे हाती लागत आहेत. त्यातून चार हजार वर्षांपूर्वीची सामाजिक स्थिती समजली. सध्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डीएनए सुद्धा काढले जातात. आपल्याकडे या नव्या पद्धतीचा योग्य वापर होत नसल्याचे दिसते आहे.
गावडे म्हणाले, पुरातत्व संशोधनातून माणसांच्या जीवनपद्धतीचा वेध ढवळीकरांनी घेतला आहे. या क्षेत्रातील संशोधनात त्यांनी मोठी भर घातली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्य यांनी, तर आभार प्रदर्शन महाजन यांनी केले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.