इथल्या अनेक वैशिष्टय़ांपैकी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘कृपासिंधू’चे मालक राहुल वाटवे हे स्वत: देखील इथे जेवण वाढण्याचं काम करतात. प्रत्येकाला हवं-नको विचारतात. जेवण आवडलं का, पदार्थाबद्दल काही सूचना आहेत का, असंही ते आवर्जून विचारतात. कोणी चांगली सूचना केली तर तसा बदलही करतात. मुख्य म्हणजे इथे जेवण करून बाहेर पडणारा प्रत्येक जण तृप्त होऊन बाहेर पडतो..
खऱ्या खवय्याला खाण्याचं एखादं चांगलं, नवं ठिकाण सापडलं की फार आनंद होतो. गेल्या आठवडय़ात असंच एक नवं ठिकाण सापडलं. हे नवं ठिकाण म्हणजे दोन-अडीच महिन्यांपूर्वी सुरू झालेला ‘कृपासिंधू’ डायनिंग हॉल. खास महाराष्ट्रीय पद्धतीची चवीष्ट थाळी हे या डायनिंग हॉलचं वैशिष्टय़ं. अर्थात अनेक बाबतीत इथली खासियत आहे आणि त्यासाठी ‘कृपासिंधू’मध्ये जेवायलाच हवं. आपले टिपिकल मराठी चवींचे तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ इथल्या थाळीत असतात आणि मराठी चवीचा आनंद इथे पुरेपूर मिळतो, हे नक्की.
राहुल आणि गौरी वाटवे यांनी हा डायनिंग हॉल सुरू केला आहे. राहुल वाटवे मूळचे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर. विविध नामांकित कंपन्यांमधला या क्षेत्रातला उच्च पदांवरच्या कामाचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. कंपन्यांमध्ये काम करत असतानाही केव्हा तरी डायनिंग हॉल सुरू करायचा ही त्यांची इच्छा होती. त्यातूनच या नव्या क्षेत्राकडे ते वळले. अर्थात त्यासाठी त्यांनी आधी विविध पदार्थ, त्यांच्या पारंपरिक चवी, त्या पदार्थामध्ये वापरले जाणारे घटकपदार्थ आदी विविध बाबींवर खूप संशोधन केलं आणि त्यानुसार हळूहळू त्यांनी थाळी विकसित केली.
थाळीतल्या पदार्थाकडे आता वळू या. गरम गरम, अगदी तव्यावरची पोळी आणि तेलकट नसलेली फुगलेली पुरी इथून आपण जेवणाची सुरुवात करू शकतो. थाळीत मटकी किंवा बिरडय़ा किंवा मटार, हरभरा, चवळी आदींपैकी एक उसळ असते. फ्लॉवर-बटाटा रस्सा, भेंडी फ्राय, भरलं वांगं, व्हेज कुर्मा, छोले, डाल पालक, मिक्स व्हेज, पालक पनीर यापैकी दोन भाज्याही थाळीत असतात. वेगवेगळ्या चवींच्या कोशिंबिरी ही देखील इथल्या थाळीची खासियत आहे. कैरीची डाळ, खमंग काकडी, बिटाची कोशिंबीर, कांदापात कोशिंबीर आदी अनेक प्रकार इथे चाखायला मिळतात आणि आपण न कळतच वा अशी दाद देऊन जातो. कोथिंबीर भात, मसाले भात, कोबी राइस, जिरा राइस, बिर्याणी यापैकी एक भाताचा प्रकारही थाळीत असतो. शिवाय जेवणाच्या शेवटी येणारा वरण-भातही आवर्जून घ्यावा असाच. दहीवडा, व्हेज कटलेट, मटार करंजी, कांदा भजी, छोटे बटाटेवडे यापैकी एखादा पदार्थ फरसाण म्हणून या थाळीत दिला जातो. शिवाय पापड आणि ताकही असते. नरसोबाची वाडी येथील बासुंदी तसंच श्रीखंड, आम्रखंड, आमरस, गुलाबजाम, मुगाचा शिरा यापैकी कोणताही पदार्थ आपण स्वीट म्हणून घेऊ शकतो. अर्थात ते आपल्या रुचीनुसार-आवडीनुसार. शिवाय चटण्या, लोणची हेही केवळ इथे शोभेपुरतं नसतं तर तेही चवीष्ट असतं. सगळेच पदार्थ वाखाणण्यासारखे आणि त्या त्या चवींचे असले, तरी आमटी, आळूची भाजी, कोशिंबिरींचा उल्लेख करायलाच हवा.
थाळीत जे पदार्थ द्यायचे ते दर्जेदार द्यायचे आणि जेवणाऱ्या प्रत्येकाचं समाधान झालं पाहिजे, हा राहुल यांचा आग्रह असतो आणि तो आपल्याला त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनही सतत जाणवतो. ते स्वत: चोखंदळ आणि खवय्ये असल्यामुळे प्रत्येक पदार्थ चांगलाच बनेल, ग्राहकांना चांगली सेवा मिळेल याकडे तेोणि गौरी हे दोघेही लक्ष देत असतात. ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण थाळी संपवणं शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी इथे दरामध्ये सवलतही आहे. शिवाय ज्यांना जेवायला यायला जमत नाही अशांसाठी लंच बॉक्स, टिफिन यांचीही सोय लवकरच सुरू होत आहे. ‘कृपासिंधू’ची जागा प्रशस्त असल्यामुळे इथल्या पार्टी हॉलमध्ये वाढदिवस आणि अन्य अनेकविध छोटे समारंभही इथल्या थाळीसह छान रंगतात. जळजळीत मसाले किंवा भरपूर तिखट न वापरता तयार केलेले आणि तरीही चवदार पदार्थ या थाळीत मिळत असल्यामुळे इथे आलेला प्रत्येक जण थाळीचं कौतुक करतच बाहेर पडतो, हे सगळ्यात महत्त्वाचं.
कृपासिंधू
- कुठे – ६७२ नारायण पेठ, मोठी नूमवि प्रशालेसमोर
- कधी – सकाळी ११:३० ते दुपारी ३:३० आणि सायं. ७:३० ते रात्री १०:००
- संपर्क- २४४४४२२३