लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने कुमार महाराष्ट्र केसरी असणारा पैलवान विक्रम शिवाजीराव पारखी (वय ३०) याचा जागेवरच मृत्यू झाला. पैलवान पारखी यांचा १२ डिसेंबर रोजी विवाह होणार होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळच असल्याने संसाराच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच ते आयुष्याच्या आखाड्यात चितपट झाले.
कुमार महाराष्ट्र केसरी, ब्रॉंझ पदक, आदर्श व गुणी खेळाडू असे अनेक किताब पटकावलेल्या पैलवानाच्या अचानक जाण्याने सर्व मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. २८ नोव्हेंबर २०१४ रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४” झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत.
आणखी वाचा-चिंचवडचे आमदार ओळखीचे असल्याचे सांगत पोलिसाला नोकरी घालविण्याची धमकी
आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनेक पदके व किताब आपल्या नावावर करत विक्रम करणारा हा पैलवान युवा पैलवनांसाठी आदर्श होता. कुस्ती क्षेत्रात त्याला आदर्श व गुणी खेळाडू म्हणून संबोधले जायचे. झारखंड इथल्या रांचीमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने ब्रॉंझ पदक मिळवले होते. मुळशीतल्या माले केसरी स्पर्धेचा विजेता बनवून माले केसरी किताब व गदा मिळवली होती. अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेत माण गावचे आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रम पारखी याने उंचावले होते. हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांच्याशी त्याचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. विक्रम यांच्या पश्चात आई, वडील, एक विवाहित भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.