गेल्या एक महिन्यांपासून सुरु असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदावर रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला आहे. रासने यांच्या पराभवानंतर तब्बल २८ वर्षापासून ताब्यात असलेला बालेकिल्ला भाजपाच्या हातून निसटला आहे. यावर आता भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टीव्ही ९ मराठीशी बोलताना कुणाल टिळक यांनी सांगितलं की, “या निवडणुकीचं एका दिवसात विश्लेषण करता येणार नाही. अकरा हजार मतांनी का पराभव झाला, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कोणत्या बूथवर कमी पडलो, कुठं अपेक्षित मतदान झालं नाही, कोणत्या नगसेवकांच्या मतदारसंघातून मतदान झाला नाही, याचा अहवाल येतो. तेव्हा खरं कारण कळेल.”
“प्रत्येक कार्यकर्ता, नेता, मंत्र्याने जोमाने प्रचार केला होता. कोणत्याही मतदारसंघात असा प्रचार झाला नाही, तसा कसब्यात झाला. कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचलो. ५० टक्क्यांहून जास्तीत जास्त मतदान करण्याचं आमचं आव्हान होतं. ते पूर्ण केलं. पण, मतपेटीत मतदान भाजपाकडे वळलं नाही. त्यामागे विविध कारणे असून शकतात. कुठं आम्ही कमी पडलो, कोणत्या अजेंड्यात कमी पडलो, मतदारापर्यंत पोहचून संदेश देण्यात कमी पडलो का? हे समोर येईल,” असे म्हणत कुणाल टिळक यांनी रवींद्र धंगेकरांचं अभिनंदन केलं आहे.