औरंगाबादेतील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचा दावा करत शरद पवारांवर निशाणा साधला. त्यांच्याकडेही जातीय दृष्टीकोनातून पाहणार का? असा सवाल राज ठाकरेंनी शरद पवारांना केला होता. मात्र राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर वाद सुरु झाला असून अनेक अनेक दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. त्यातच आता लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे काम लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने झालं आहे. त्यावर कोणीही राजकारण करू नये, अशी भूमिका श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळमार्फत पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे, माजी अध्यक्ष जगदीश कदम आणि लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक उपस्थित होते. यावेळी कुणाल टिळक यांनी आपली भूमिका मांडली.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडताना रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य-टिळकांनी बांधली, मग टिळकांनाही तुम्ही ब्राह्मण म्हणूनच बघणार का?, असा सवाल केला होता. तसंच लोकमान्य टिळकांनी जे पहिलं वर्तमानपत्र काढलं त्याचं नाव मराठा होतं हे शरद पवार कधी सांगणार नाहीत असंही ते म्हणाले होते.

टिळकांचे पणतू कुणाल टिळक यांनी मांडली भूमिका

“लोकमान्य टिळक यांच्या कार्याबद्दल सोशल मीडियावर जी काही चर्चा सुरू आहे त्यावर मी माझी भूमिका दोन दिवसांपासून मांडत आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत लोकमान्य टिळक यांच्याबद्दल जी भूमिका मांडली मी त्याचा विरोध किंवा निषेधदेखील करत नाही. पण त्याचदरम्यान जितेंद्र आव्हाड आणि अन्य काही इतिहासकार म्हणतात की,लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाकरता एक वीटदेखील हलवली नाही. त्यावर माझा आक्षेप आहे”.

लोकमान्य टिळकांच्या पुढाकारानेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे काम पूर्ण – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ

“लोकमान्य टिळक यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाकरता फार मोठे योगदान आहे. ते आपण विसरता कामा नये. ते नाकारणे म्हणजे लोकमान्य टिळकांच्या कार्याचा अपमान आहे,” अशी भूमिका कुणाल टिळक यांनी मांडली. तसंच लोकमान्य टिळक यांच्यावरून जे राजकारण सुरू आहे ते खूप घाणेरड्या प्रकारे सुरू आहे आणि कृपया हे थांबवलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान टीव्ही ९ सोबत बोलतानाही त्यांनी यावर भाष्य केलं होतं. “टिळक परिवारातील कुणीही आजपर्यंत असा कुठलाही दावा केला नाही. पण राज ठाकरे यांच्या एका वाक्यामुळे जी काही सोशल मीडियावर, फेसबुक, ट्विटरवर टिळकांचा अपमान केला जातोय, टिळकांच्या नावाची खिल्ली उडवली जातेय. एका वाक्यामुळे टिळकांच्या कार्याचा अपमान व्हावा, ब्राह्मण द्वेष व्हावा हे काही बरोबर नाही”.

“लोकमान्य टिळक असताना शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत तळेगावचे दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एक बैठक झाली होती. त्याचे अध्यक्षही दाभाडेच होते. समाधी उभारण्यासाठी राज्यातील जनतेकडून पैसे गोळा करण्याचं ठरलं. त्यानुसार त्यावेळी काही हजार रूपयेही गोळा करण्यात आले आणि ते त्यावेळच्या डेक्कन बँकेत ठेवण्यात आले. त्या पैशातूनच सरकारी प्रॉमिसरी नोट वैगेरे खरेदी करण्यात आली होती. मात्र कालांतराने ती बँक दिवाळखोरीत निघाली आणि ते पैसे बुडाले. या पैशासंदर्भातील सगळा हिशोब त्यावेळच्या केसरी वर्तमान पत्रात छापून आलेला आहे. त्याच्या प्रती आजही गायकवाड वाड्यात उपलब्ध असल्याचे सांगत कोणाला हव्या असल्यास ती माहिती आम्ही काढून दाखवू शकतो,” असेही ते म्हणाले.

“पहिल्यांदा तीन दिवसांची शिवजयंती साजरी करण्याचं ठरवलं होतं. पण ब्रिटीशांनी त्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकमान्य टिळक रायगडावरून महाबळेश्वर येथे त्यावेळचे ब्रिटीश अधिकारी सँण्डहर्स्ट यांना भेटले. त्यानंतर परवानगी मिळाली आणि पहिल्यांदा तीन दिवस शिवजयंती साजरी करण्यात आली,” असंही त्यांनी सांगितलं.

“या पूर्ण समाधी समितीचं, ब्रिटिशांमध्ये, महाराजांच्या वंशजांमध्ये, सर्व सरदार, संस्थानिकांमध्ये समन्वय घडवून आणण्यात टिळक अग्रेसर होते. टिळकांनी यात पुढाकार घेतला. टिळकांनी १८९५ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात रे मार्केटमध्ये एक सभा घेतली. ज्यात सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आणि मदन मोहन मालविय यांसारख्या दिग्गजांनी शिवाजी महाराजांनी काय काय केलं आणि त्यातून कशी प्रेरणा आपल्याला घेता येईल हे सांगितलं. राष्ट्रीय स्तरावर महाराजांचं कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न टिळकांनी केला, त्यात पुढाकार घेतला, एवढं काम पुरेसं नाही का?,” असा सवालही कुणाल टिळक यांनी विचारला आहे.