नाताळ आणि नवीन वर्षांच्या सुट्टय़ांसाठी पुणेकरांची पावले नेहमीप्रमाणे केरळ व राजस्थानला वळाली असतानाच, आता ब्रॅन्ड अॅम्बेसिडर अमिताभ बच्चन यांच्यामुळे पर्यटकांमध्ये गुजरातचे आकर्षणही वाढले आहे. युवा पर्यटक ‘कुछ हटके’ म्हणत नव्याने विकसित झालेल्या कर्नाटकमधील कूर्ग, केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील आंबा घाटाकडे वळाले आहेत.. असा कल बदलत असताना नेहमीचे गोवा आणि महाबळेश्वर या पर्यटनस्थळांची बाजारपेठ नेहमीप्रमाणे फुललेलीच आहे.
पर्यटनासाठी पुणेकरांपुढे सध्या खूप पर्याय उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील ठिकाणांपासून थेट आग्नेय आशियाई देशांमधील टूर्स आवाक्यात आल्या आहेत. मात्र, सध्याच्या थंडीच्या हंगामात केरळ आणि राजस्थानला जास्तीत जास्त पुणेकरांची पसंती लाभली आहे. याबाबत ‘भारत परिक्रमा’चे वरिष्ठ व्यवस्थापक मंगेश बेंडखळे यांनी सांगितले, ‘डॉलरचा दर वाढल्यामुळे पुणेकरांचा कल जवळ जाण्याकडे आहे. त्यामुळे गोवा आता पर्यटकांनी पूर्णपणे भरून गेले आहे. त्याचबरोबर केरळ व राजस्थानलाही मोठी मागणी आहे. केरळची सर्व प्रमुख हॉटेल्स भरलेली आहेत. विशेषत: ठेकाडी, मुन्नार येथे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंतची बुकिंग फुल्ल आहेत. हॉटेल्सच्या दरात वीस टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. केरळला जाणाऱ्या सर्व ट्रेन पूर्णपणे बुक आहेत. तत्काळची तिकिटेसुद्धा दोनच मिनिटांत संपून जातात. राजस्थानमधील उदयपूर, जयपूर, मारवाड, मेवाड अशा सर्वच भागांना मागणी आहे. सर्वच ठिकाणी १५ डिसेंबर ते ६ जानेवारी या काळासाठी हॉटेल्सच्या दरात २० टक्क्य़ांची वाढ झाली आहे.’
या दोन राज्यांना गुजरात स्पर्धा करू लागले आहे. पर्यटक अमिताभ बच्चन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. ‘गुजरातला पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यासाठी या राज्याने केलेली जाहिरात व पर्यटकांसाठीच्या सुविधा कारणीभूत आहेत. तरुण पर्यटकांना काही तरी नवे हवे असते. त्यासाठी त्यांच्याकडून कर्नाटकमधील कूर्ग, केरळमधील वायनाड यांसारख्या ठिकाणांना पसंती मिळत आहे. आग्नेय आशियाई देशांमध्ये बँकॉक, सिंगापूर, मलेशिया येथेही पर्यटक जात आहेत. विशेष म्हणजे आता थंडीच्या दिवसांतही तरुण मंडळी हिम असलेल्या ठिकाणांची चौकशी करत आहेत,’ असे ‘वीणा वर्ल्ड’चे पुण्यातील व्यवस्थापक संदीप जोशी यांनी सांगितले.
— प्रमुख मुद्दे —
– केरळ, राजस्थानच्या रेल्वे फुल्ल
– गुजरातही नव्याने स्पर्धेत
– विशेषत: सौराष्ट्राकडे (सासंगीर, सोमनाथ, द्वारका) ओढा
– केरळचा विमानप्रवास दीडपट महागला
– कोल्हापूरजवळ आंबा घाट नवे आकर्षण
– हनीमूनसाठी सिमला, मनाली अशा थंड ठिकाणांना मागणी
नव्याने मागणी वाढलेली ठिकाणे-
– कारवार, गोकर्ण महाबळेश्वर (कर्नाटक किनारा)
– कूर्ग (कर्नाटक), वायनाड (केरळ)
– महाराष्ट्रात आंबा घाट
महाराष्ट्रात कोकण अन् महाबळेश्वरच!
महाराष्ट्रात एखादा-दुसरा अपवाद वगळता नव्याने फारशी पर्यटनस्थळे विकसित झालेली नाहीत. त्यामुळे कोकण आणि महाबळेश्वर या ठिकाणांकडेच पर्यटकांचा जास्त ओढा आहे. त्यामुळेच कोकणात आता तारकर्ली, सिंधुदुर्ग, कणकवली, गणपतीपुळे अशी सर्वच ठिकाणे फुल्ल झाली आहेत. महाबळेश्वरही जवळजवळ भरून गेलेले आहे.
आंबा घाट वाढतोय..
कोल्हापूरजवळ आंबा घाटात गेल्या तीन वर्षांत हॉटेल्सची संख्या १२-१३ इतकी झाली आहे. शिवाय घरगुती राहण्याची, जेवणाची व्यवस्था आहे. जवळच जंगल आणि कडवी धरण, विशाळगडाच्या पायथ्याला गेळवडे धरण असल्याने हा परिसर नवे आकर्षण ठरतो आहे.

Story img Loader