अजित अभ्यंकर (कामगार नेते)
वाचन करताना कोणत्याही गोष्टीच्या मुळाकडे जाण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे वाचन करताना केवळ विशिष्ट विचारसरणीचेच वाचन करावे, असे मी कटाक्षाने टाळतो. विचारांनी जरी मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा असलो तरी वाचनामध्ये मला कोणतीही विचारसरणी त्याज्य नाही.
मी कथा, कादंबरी, कविता, ललितगद्य असे साहित्य फारसे वाचलेले नाही. त्यामुळे रुढार्थाने काही मी साहित्याचा वाचक नाही. तसा दावादेखील करू शकणार नाही. पण, माझे उपयोजित वाचनामध्ये योगदान हे नक्कीच आहे. सैद्धांतिक वाचन करून विचार करायचा आणि संवादाच्या माध्यमातून चळवळीमध्ये किंवा कोणत्याही प्रसंगाला उत्तर म्हणून या सैद्धांतिक वाचनाची मांडणी करण्याइतपत माझे वाचन आहे.
माझा जन्म तांत्रिकदृष्टय़ा नगरमधील असला तरी संपूर्ण बालपण पुण्यामध्येच गेले. पेरुगेट भावे स्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि नंतर बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेची पदवी घेतली. शाळेमध्ये असताना माझी वाचनाची सुरुवात ही प्रामुख्याने नाटकांच्या वाचनाने झाली. इयत्ता सातवीमध्ये असताना स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शन कार्यक्रमात संताजी-धनाजी यांच्या गनिमी काव्यावर बेतलेल्या ‘बोलकी भिंत’ नाटिकेमध्ये मी मुसलमान सरदाराची भूमिका केली होती. त्या भूमिकेला अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास आला. रंगमंचाची भीती दूर झाली आणि अकरावी मॅट्रिक होईपर्यंत मी आंतरशालेय नाटय़स्पर्धेत सहभाग घेत होतो. शाळेत असताना मला बाबूराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथा वाचनाचा छंद होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘सहा सोनेरी पाने’, ‘माझी जन्मठेप’ ही पुस्तके आणि निबंध वाचले आहेत.
महाविद्यालयात गेल्यानंतर प्रदीप आपटे, सतीश जकातदार, दीपक ओक असा आमचा बुद्धिजीवी विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. प्रा. सुहास तांबे यांनी लिहिलेल्या एकांकिका आम्ही पुरुषोत्तम करंडकमध्ये करीत असू. नाटकामुळेच मला तीन वर्षे ज्येष्ठ असलेल्या मोहन जोशी याच्याशी छान मैत्री झाली. त्या कालखंडात समांतर नाटकाची चळवळ रुजत होती. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, उत्पल दत्त, अमोल पालेकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार ही नावे परिचित झाली. नाटकाच्या वाचनातून समांतर विचारांशी परिचय झाला. दलित साहित्य चळवळीतील डॉ. गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, बाबूराव बागूल यांच्या साहित्यासह नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन झाले. बा. सी. मर्ढेकर यांच्या कविता वाचल्या आहेत. त्याचबरोबरीने झुंजार, धनंजय, जेम्स हॅडली चेस यांच्या कथांचेही वाचन केले. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘काचेचा चंद्र’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकांमुळे वसंत कानेटकर हे माझे आवडते लेखक झाले. त्याच कालखंडामध्ये देशात जयप्रकाश नारायण यांची आंदोलने सुरू झाली. महागाईविरोधी आंदोलने, गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले. नाटकाच्या तालमीच्या निमित्ताने आम्ही कधी कॅफे गुडलकला, कधी लक्ष्मी रस्त्यावरील अंबादासला रात्र-रात्र चर्चा करीत बसायचो. सगळे संपल्यावर पहाटे मंडईमध्ये मार्केट उपाहारगृहामध्ये मिसळ खाऊनच झोपायला घरी परतायचो. त्याकाळी सत्यकथा मासिक, भालचंद्र नेमाडे, श्रीलाल शुक्ल यांचे लेखन वाचून दृष्टी व्यापक झाली. श्री. ग. माजगावकर यांच्या ‘माणूस’मध्ये अरुण साधू यांचे ‘फिडेल, चे व क्रांती’ हे सदर, साधू यांचे ‘आणि ड्रॅगन जागा झाला’ हे क्युबन क्रांतीवरचे पुस्तक, वि. ग. कानिटकर यांची ‘माओ क्रांतीचे चित्र व चरित्र’ आणि ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या पुस्तकांच्या वाचनातून मी डाव्या विचारसरणीकडे आकृष्ट झालो. १९७४ मध्ये ‘स्पर्श’ या नक्षलवादी ग्रुपशी अपघाताने संबंध आला.
या ग्रुपमध्ये उद्योजक, बँक अधिकारी आणि नौदल अधिकाऱ्यांची अशी ‘एलिट क्लास’मधील मुले होती. हॉटेल वैशालीच्या बाहेर ते नियतकालिक विकायला बसायचे. त्या नियतकालिकाच्या वाचनातून
पुढे मग मार्क्सवाद वाचून काढला. त्यामुळे या मुलांचा मार्ग अतिरेकी आणि चुकीचा असल्याचे ध्यानात आले. आणीबाणीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा तर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला होता. मार्क्सवादाची पुस्तके वाचताना त्यावरील टीका आणि समांतर प्रवाहांचे संदर्भ म्हणून एंगल्स, लेनिन, माओ, महात्मा गांधी, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचले गेले. १९७३ मध्ये प्राध्यापकांच्या संपाविरोधात मी विशाल सह्य़ाद्री वृत्तपत्रात लेख लिहिला होता. त्याच वृत्तपत्रासाठी वसंत व्याख्यानमालेचे वार्ताकन करण्याच्या निमित्ताने विविध विषयांशी परिचय झाला. न्यू इंडिया अॅश्युअरन्समध्ये काम करीत असताना ए. डी. भोसले आणि अशोक मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्रमिक विचार’साठी पत्रकार म्हणून काम केले. साम्यवादी विचारसरणीतून परिचय झालेल्या गुजराती जैन समाजातील मुलीशी आंतरजातीय विवाह केला. एकाने म्हणजे पत्नीने नोकरी करायची आणि मी चळवळीमध्ये काम करायचे हे आम्ही ठरविले होते. त्यानुसार ‘मी श्रमिक विचार’च्या कामासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.
‘श्रमिक विचार’चा राजीनामा दिल्यानंतर मी ‘बीएमसीसी’मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. नोकरी सांभाळून पक्ष कार्य करता येत होते. मात्र, कॉ. प्रभाकर मानकर यांच्या निधनानंतर माझ्याकडे जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी आल्यामुळे मी नोकरीचा राजीनामा दिला.
१९९० नंतरच्या काळात मी फ्रिटजॉफ काप्रा, एरिक फॉम, डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. रावसाहेब कसबे यांच्या साहित्य वाचनाबरोबरच ‘काळा पैसा (ब्लॅक मनी) आणि वित्त (फायनान्स)’ या विषयांवरील वाचन प्रचंड केले आहे. तत्त्वज्ञान, राजकीय सिद्धांत समजून घेण्याच्या उद्देशातून वाचन करीत राहिलो. भारतीय तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी २००७ मध्ये संस्कृतमधून एम. ए. केले. गोळवलकर गुरुजी यांचे ‘बंच ऑफ थॉटस’, डॉ. स. ह. देशपांडे, डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या पुस्तकांचे वाचन केले. सध्या मी सिंबायोसिसमध्ये ‘भांडवलशाहीचा इतिहास’ आणि ‘तत्त्वज्ञानाचा परिचय’ हे विषय शिकविण्यासाठी जातो. त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून माझे वाचन होत असते. वैचारिक वाचनामधूनच मी घडलो.