पिंपरी : औद्योगिक, कामगारनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये लाखो कामगार स्थायिक झाले आहेत. आशिया खंडातील सर्वांत मोठी एमआयडीसी म्हणून पिंपरी-चिंचवडचा लौकिक असताना आजही कामगारांच्या प्रश्नासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे चाकण, तळेगाव, वासुली, लोणावळा, हिंजवडी या परिसरातील कामगारांसाठी पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र कामगार आयुक्त कार्यालय स्थापन करण्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी याबाबतची मागणी केली होती. खाडे यांनी लवकरच कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले. पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र ओळख आहे. शहरात पोलीस आयुक्तालय, तहसील कार्यालय, न्यायालय देखील आहे. मात्र, कामगार आयुक्त कार्यालय नसल्याने कामगारांना त्रास होत आहे. शहराचे विस्तारीकरण झाले आहे. पिंपरी-चिंचवडसह हिंजवडी, तळेगाव, चाकण, लोणावळा ते वासुलीपर्यंत असा औद्योगिक परिसर वाढला आहे. या परिसरामध्ये अनेक कंपन्या आहेत. कामगारांना अडचणी सोडविण्यासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे स्वतंत्र कामगार आयुक्तालय आवश्यक असल्याचे नखाते यांनी सांगितले.
हेही वाचा : पुणे मेट्रो सुसाट, पण एसटी जागेवरच!
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र कामगार कार्यालयाची स्थापना करून स्वतंत्र उपायुक्त, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. खाडे यांनी मागणी मान्य करत लवकरच याबाबत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्याचे नखाते म्हणाले.